कशाला एनआयसीच्या मिनतवाऱ्या! ‘मुद्रांक’ने थेट अधिकारीच नेमला!!
विजय चव्हाण
सर्व्हरमध्ये वारंवार तांत्रिक अडचणी येऊन दस्तनोंदणीसह विविध प्रकारचे सर्च घेण्यात अडथळे आल्यावर ही समस्या सोडवण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राष्ट्रीय माहिती-विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) कार्यालयात एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. यामुळे तांत्रिक अडचणी आल्यानंतर हा अधिकारी तातडीने त्या दूर करून व्यवहार सुरळीत ठेवण्यात मदत करणार आहे.
राज्यात दररोज साडेनऊ ते दहा हजार दस्तांची नोंदणी होते. त्याचबरोबर अडीच ते तीन हजार ऑनलाइन भाडेकरार नोंद होतात. सण, उत्सव आणि विशेष दिवशी मालमत्ता खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणावर होते. मात्र, अनेक वेळा सर्व्हरवर ताण येऊन दस्त नोंदणी बंद पडते किंवा सर्व्हर धिम्या गतीने काम करतो. अनेकदा सर्च रिपोर्ट तयार करण्यासाठी अडचणी येतात. याबाबतच्या तक्रारी नोंदणी विभागाकडे येत आहेत. त्यांची माहिती एनआयसीला दिली जाते. त्यानंतर शोध घेऊन दुरुस्ती केली जाते. अनेकदा यामध्ये विलंब होतो. त्यावर उपाय म्हणून एका अधिकाऱ्याची नेमणूक करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे.
राज्यभरात दररोज सुमारे अडीच ते तीन हजार भाडेकराराच्या दस्तांची नोंदणी होते. मागील महिन्यात नोंदणी विभागाच्या सर्व्हरला तांत्रिक अडचणी असल्यामुळे त्यांची नोंदणी करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे संपूर्ण राज्यात सुमारे सहा हजारांहून अधिक प्रकरणे दस्तनोंदणीसाठी प्रलंबित होती. मध्यंतरी तांत्रिक अडचणी दूर झाल्यामुळे काही प्रमाणात प्रलंबित दस्तांची नोंदणी टप्याटप्प्याने पूर्ण करण्यात आली. परंतु पुन्हा सर्व्हरमध्ये अडचणी येऊ लागल्याने हे काम मागील अनेक दिवसांपासून थांबले आहे. त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.
ऑनलाइन भाडेकराराची (लिव्ह अँड लायसन्स) संगणकप्रणाली कालबाह्य झाली आहे. त्यामुळे भाडेकराराचे दस्त नोंदविण्यात सातत्याने अडचणी येत असल्याची माहिती समोर आली होती. या संदर्भात नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे म्हणाले, ‘‘सर्व्हरला तांत्रिक अडचणी आल्यास दस्त नोंदणीत अडथळे येतात. अनेकदा धिम्या गतीने कामकाज चालत असल्याच्या तक्रारी येतात. यावर उपाययोजना म्हणून एका अधिकाऱ्याची नेमणूक ‘एनआयसी’मध्ये केली आहे. त्यामुळे सर्व्हरला आलेली समस्या तांत्रिक आहे किंवा विभागाच्या संगणक प्रणालीत दोष आहे, हे लगेच समजू शकणार आहे. तसेच तातडीने अडचण दूर होऊन दस्त नोंदणी पूर्ववत होऊ शकेल.’’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.