कोणता झेंडा घेऊ हाती?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत अजित पवार सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांच्या या बंडानंतर शहरातील नेत्यांमध्ये नक्की कोणाच्या बाजूने जायचे याबाबत कमालीचा संभ्रम असल्याचे दिसून येते. पक्षाचे नेते द्विधा मनस्थितीत आहेत तर कार्यकर्त्यांमध्ये नक्की कोणाचा झेंडा हाती घ्यावा याबाबत गोंधळाचे वातावरण आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Tue, 4 Jul 2023
  • 06:17 am
कोणता झेंडा घेऊ हाती?

कोणता झेंडा घेऊ हाती?

अजित पवारांच्या बंडानंतर कोणाच्या बाजूने जायचे याविषयी नेते, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, काही जण मौनात, तर काही म्हणतात दोघेही आमचेच नेते

विजय चव्हाण / विशाल शिर्के

vijay.chavan@civicmirror.in/ vishal.shirke@civicmirror.in

TWEET@VijayCmirror/@vishal_mirror

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत अजित पवार सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले. मात्र, त्यांच्या या बंडानंतर  शहरातील नेत्यांमध्ये नक्की कोणाच्या बाजूने जायचे याबाबत कमालीचा संभ्रम असल्याचे दिसून येते. पक्षाचे नेते द्विधा  मनस्थितीत आहेत तर कार्यकर्त्यांमध्ये नक्की कोणाचा झेंडा हाती घ्यावा याबाबत गोंधळाचे वातावरण आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यासमवेत कोण कोण नेते आहेत, हे मंगळवारी (दि.४) दुपारी १ वाजता होत असलेल्या शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांनी रविवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. 

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करत असल्याचे पत्र सोमवारी काढले. अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील यांना पक्षाध्यक्षपदावरून मुक्त करत असल्याचे लगेचच जाहीर केले. पक्षांतर्गत बंडाळीमुळे वरिष्ठ नेत्यांमध्ये संघर्ष दिसून येत आहे. राज्य महिला आयोगाच्या नेत्या तथा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर या उघडपणे अजित पवार यांच्यासमवेत गेल्या आहेत. राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फटाके वाजवले. काहींनी पेढे वाटले. बहुतंश जणांनी मौनात जाणे पसंत केले.   

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहरातील नेत्यांमधील संभ्रमावस्था कायम असल्याचे दिसून येत आहे. अनेक नेत्यांना अजूनही नक्की कोणाबरोबर जावे हे ठरवता आलेले नाही. काही नेते पवार कुटुंबीयातील ज्येष्ठ सदस्य आमचे नेते असल्याचे सांगत आहेत. काही जण पक्ष फुटलाय हेच मान्य करायला तयार नाहीत. लवकरच सर्व सुरळीत होईल, असा आशावाद व्यक्त करताना दिसत आहे. शहरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना नक्की कोणाबरोबर जावे हे समजत नाही. आता आमच्यातही शिवसेनाप्रमाणे चिन्हावरून लढा होईल. शिवसेनेचा चिन्हाचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यामुळे चिन्ह ज्याला मिळेल, त्यासोबत आम्ही जाऊ, अशी भूमिकाही काही कार्यकर्त्यांनी घेतली आहे.

अजित पवार शहराच्या राजकारणात पक्ष स्थापनेपासूनच लक्ष घालत आहेत. काँग्रेसकडून महापालिका राष्ट्रवादीच्या हाती आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग शहरात मोठा आहे. सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा बराचसा भाग येतो. त्यामुळे कात्रज, धनकवडी, सिंहगड रस्ता आणि वारजे भागात सुळे यांचा कायम वावर असतो. त्यामुळे त्यांनीही या भागात आपली स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे. शहरातील इतर भागातही विविध कार्यक्रमांनिमित्त ते स्थानिक नेत्यांशी संवाद साधत असतात. असे असले तरी अजित पवार यांचा अनेकांशी दीर्घकाळापासून वैयक्तिक संपर्क आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अधिक पसंती दिसत आहे. दुसरीकडे शरद पवार आणि सुळे यांच्या विषयी आस्था असल्याने अनेक नेते थेटपणे भूमिका घेणे टाळत आहेत. त्यातच महापालिकेची निवडणूक कधी होईल याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे आताच एकाची बाजू घेऊन विशिष्ट शिक्का आपल्यावर बसणार नाही याची काळजीही अनेकजण घेताना दिसत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे म्हणाले, मंगळवारी (दि. ४) दुपारी एक वाजता पक्षाच्या शहर मुख्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात शहरातील सर्वच पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आहे. गेले दोन दिवस शहरातील अनेकांशी फोनवर संवाद झाला आहे. त्यांनी आम्ही पक्षासोबत असल्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, प्रत्यक्ष बैठकीला कितीजण येतील हे मंगळवारी स्पष्ट होईल. त्यानंतर बुधवारी (दि. ५) मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बैठक बोलावण्यात आली आहे. पक्षाचे संस्थापक शरद पवार साहेब तिथे असतील. त्यावेळी आणखी स्पष्टता येईल. त्यामुळे सध्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली काहीशी संभ्रमता लवकरच दूर होईल.  

माजी महापौर दत्तात्रय धनकवडे म्हणाले, शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे तिघेही आमचे नेते आहेत. त्यामुळे कोणाबरोबर जाणार याबाबत आज बोलणे उचित होणार नाही. काही झाले तरी मी पक्षासोबतच असेन.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सुभाष जगताप म्हणाले, आम्ही सगळे एकच आहोत. मी दोन्ही नेत्यांसमवेत आहे. लवकरच सर्व निवळेल. बुधवारी (दि. ५) अजित पवार यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे.

कोथरूडमध्ये साहेबांना समर्थन 

शहरातील काही दिग्गज नेत्यांनी काही दिवसांसाठी तूर्त आपले पत्ते झाकून ठेवण्याचा निर्णय घेतला असताना कोथरूड परिसरातील काही कार्यकर्त्यांनी खुलेआम शरद पवार यांच्या समर्थनार्थ होर्डिंग्ज लावले आहेत. दरम्यान, पक्षाचे काही कार्यकर्ते याला अजित पवारांचे चुकीचे पाऊल म्हणत आहेत. हा निर्णय घेऊन पुढे कसे जायचे याबद्दल काहीजण संभ्रमात आहेत. त्यांची ही संभ्रमावस्था दीर्घकाळासाठी गोंधळात टाकणारी ठरू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सीविक मिरर’शी बोलताना  जगताप   म्हणाले, आमचा लढा आरएसएस आणि भाजपच्या अतिरेकी विचारसरणीविरुद्ध आहे आणि तो सुरूच राहणार आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे आहे आणि यापुढेही राहील. मला संधीसाधू बनायचे नाही आणि अल्पकालीन फायद्यासाठी जहाजातून उडी मारायची नाही.

राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा रुपाली पाटील म्हणाल्या, अजितदादांमुळेच मी या पक्षात आहे. ते जो काही निर्णय घेतील, मी त्यांच्यासोबत आहे. पवार साहेब आमचे आदर्श आहेत आणि कायम राहतील. पक्षातील अंतिम निर्णय पवार साहेबच घेतील. काही दिवसांत गोष्टी स्पष्ट होतील.”

पक्षाच्या आणखी एका कार्यकर्त्याने नाव न छापण्याची विनंती केली, “आम्ही भाजप आणि त्याच्या विचारसरणीला विरोध करत आहोत. त्यांच्यासोबत काम करणे आम्हाला खूप कठीण जाईल. या निर्णयाचा आगामी पीएमसी आणि सार्वत्रिक निवडणुकांवरही परिणाम होणार आहे. पवार साहेब आमचे नेते आहेत आणि ते जो काही निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल.राष्ट्रवादीचे शहर पदाधिकारी केदार मारणे म्हणाले, “आम्ही अजित दादांच्या पाठीशी उभे आहोत आणि भविष्यातही राहणार आहोत. वाढती गुन्हेगारी पाहता शहराला सक्षम पालकमंत्र्याची गरज असून ती जबाबदारी अजित पवारच पार पाडू शकतात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story