पाणी प्रायव्हेट लिमिटेड
प्रिन्स चौधरी
पावसाळ्याला अजून दीड महिन्यांचा कालावधी असताना पुणे शहर आणि उपनगराच्या काही भागांमध्ये मात्र आतापासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक टँकरचालक विविध भागांतील विहिरींमधून बेकायदा उपसा करून टँकर भरत आहेत आणि तेच पाणी रहिवाशांना दिले जात आहे. शुद्धीकरणाची प्रक्रिया न झालेले हे पाणी प्यायल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. धरणे, विहिरी आणि अन्य जलस्रोतांची उपलब्धता असूनही पाणीचोरी, अनियमित पुरवठा, गळती अशा विविध कारणांमुळे आणि पुणे महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे शहराच्या अनेक भागांतील रहिवाशांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. याचा गैरफायदा घेऊन बेकायदा टँकरव्यवसायाला उधाण आले असून, लाखोंची उलाढाल होत आहे.
कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करण्यात आल्याने काही मोठ्या सोसायट्यांनादेखील पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. स्थानिक प्रतिनिधींनी पुढाकार घेऊन टँकरसेवा न दिल्यास अनेक सोसायट्या स्वतःहून टँकरवाल्यांकडे जातात आणि पैसे देऊन पाणी विकत घेण्याची तयारी दर्शवतात. या सर्व पार्श्वभूमीवर 'सीविक मिरर'ने काही खासगी टँकर भरणाकेंद्रांना अचानक भेट देऊन तेथील वस्तूस्थिती उजेडात आणण्याचा प्रयत्न केला.
चंदननगरमध्ये अशुद्ध पाणीपुरवठा
चंदननगर, वडगाव शेरी आणि खराडी भागात दोन दशकांहून अधिक काळ पाणीटंचाई आहे. महापालिकेने या भागातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यास सुरुवात केली असली तरी, अद्यापही या भागातील पाणीसंकट कायम आहे. यामुळे आता चंदननगरमध्ये गजलक्ष्मी ज्वेलर्सच्या शेजारी असलेल्या एका व्यावसायिक संकुलात खासगी टँकर भरणाकेंद्र सुरू झाले आहे. तेथे एका विहिरीतून टँकर भरले जातात. ही विहीर अर्धवटरीत्या झाकली आहे. तेथे काम करणाऱ्या दोघांना आम्ही याबाबत विचारले असता त्यांनी नावे न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली. ते म्हणाले की, “आम्ही पाण्याच्या टँकरसाठी ८०० रुपये आकारतो आणि ५ ते ८ किलोमीटरच्या परिघात पाणी देतो. महापालिका प्रतिटँकर २५०० रुपये घेते. त्यांनी हेदेखील कबूल केले की, त्यांच्याकडील पाणी प्रक्रिया न केलेले म्हणजेच अशुद्ध होते आणि विशेष म्हणजे, ते याची कोणतीही कल्पना नागरिकांना देत नाहीत.'
साळुंखे विहारमध्येही बेकायदा उपसा
साळुंखे विहार रस्त्यावरील विहिरीतूनही पाणी काढून ते टँकरमध्ये भरून पाणीपुरवठा केला जात आहे. याबाबत तेथे काम करत असलेल्या मंजर करीमशी चर्चा केल्यावर त्याने सांगितले की, '१० हजार ५०० लिटरचा एक टँकर भरण्यासाठी आम्ही १,५०० रुपये घेतो. दिवसभर असे ८ टँकर भरले जातात.' पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया होते का, असे विचारल्यावर टीडीएस चाचणी केली जाते, असे त्याने सांगितले. मात्र, प्रमाणपत्र मालकाकडे असून, ते दाखवण्यास नकार दिला. दरम्यान, आमचे प्रतिनिधी करीमशी बोलत असतानाच तेथे त्या भरणाकेंद्राचा मालक आला. त्याने करीमला माहिती दिल्याबद्दल चांगलेच खडसावले आणि प्रतिनिधींशीदेखील वाद घातला.
विहिरीतील प्रदूषित पाण्याच्या पुरवठा होत असल्याने त्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, “प्रक्रिया न केलेले भूजल पिण्यासाठी म्हणून देण्यात आल्यास त्याबाबत बोलण्यासाठी महापालिका किंवा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधा."
पाणीपुरवठ्यासाठी ठोस यंत्रणा नाहीच
केंद्रीय जलनियंत्रण मंडळातील अधिकारी उपेंद्र धोंडे यांनी सांगितले की, 'पुण्यात दोन प्रकारच्या टँकरने पाणीपुरवठा होतो. पालिकेच्या वतीने केला जाणारा पुरवठा आणि खासगी टँकरच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा. पीएमसीतर्फे चालवल्या जाणार्या रिफिल पॉइंट्समधील पाणी पिण्यायोग्य नसले, तरी त्यावर प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे ते सुरक्षित असते. खाजगी टँकरवाले बोअरवेल, नदी, विहीर अशा कोणत्याही ठिकाणी पाणी भरतात. ते पाणी पिण्यासाठी आणि वापरण्यासाठीही अयोग्य असते. नाईलाजास्तव अनेक सोसायट्या त्याचा वापर करतात. पाणीपुरवठ्याचे निरीक्षण, नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी कोणतीही सरकारी पायाभूत सुविधा नाही.”
ते पुढे म्हणाले की, “प्रक्रिया न केलेल्या पाण्यात जीवाणूंची वाढ होत जाते. त्यातच औद्योगिक सांडपाण्याचे मिश्रण झाल्यास ते अधिक दूषित होते. याशिवाय वैद्यकीय आणि औद्योगिक कचरा टाकल्यानेही पाणी प्रदूषित होते. ज्या सोसायट्या नियमितपणे टँकरचे पाणी वापरत आहेत त्यांनी महिन्यातून एकदा तरी त्या पाण्याची चाचणी करून घ्यावी आणि पाण्याचा स्रोत कोणता आहे, हे टँकरचालकाला विचारावे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.