हुंड्यासाठी मिरची पावडर मिसळलेले पाणी अंगावर
#पुणे
हुंड्यासाठी विवाहितेच्या अंगावर मिरची पावडर मिश्रित पाणी अंगावर ओतून अनन्वीत छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच अंगावर मिठाचे पाणी टाकून जळत्या लाकडाचे चटके दिले जात. या प्रकरणी पोलिसांनी पतीसह नातेवाईकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पती नागेश कार्तिंक साहेबन्ने (वय २३), रत्ना कार्तिक साहेबन्ने (वय ४२), महादेवी जाधव (वय ५८), लिंबराज भिसे (वय ५८, सर्व रा. कोथरुड) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
क्रूर अत्याचार
याबाबत २२ वर्षीय विवाहितेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हुंड्यासाठी छळ, गंभीर मारहाण, धमकावणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुणी आणि नागेशचा ऑक्टोबर २०२१ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर तिला माहेरहून पैसे आणण्यासाठी सतत त्रास दिला जाऊ लागला. तिला शिवीगाळ करण्यात येत असे. तसेच पाण्यात मिरची पावडर मिसळून अंगाची लाही लाही करणारे पाणी हातपाय बांधून तिच्या अंगावर टाकले जाई. तसेच अंगावर मिठाचे पाणी टाकून चुलीत पेटलेल्या लाकडाने चटके दिले. अत्याचार आणि छळामुळे घाबरलेल्या तरुणीने कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
हे अत्याचार असह्या झाल्यावर तीने पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधून सासूकडून मारहाण सुरू असल्याची तक्रार केली होती. या घटनेची माहिती मिळताच कोथरुड पोलीस घटनास्थळी पोहोचले. तिला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कोकाटे यांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१ या अधिनियमातील कलम २ अन्वये हुंडा या शब्दाची व्याख्या विवाहातील एका पक्षाने विवाहातील अन्य पक्षास किंवा विवाहातील कोणत्याही पक्षाच्या आई-वडिलांना अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीने किंवा तत्पूर्वी किंवा त्यानंतर कोणत्याही वेळी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे दिलेली किंवा द्यावयाचे कबूल केलेली कोणतीही संपती अथवा मूल्यवान रोख असा आहे. परंतू त्यामध्ये ज्या व्यक्तींना मुस्लिम व्यक्तिगत कायदा (शरीअत) लागू आहे त्या व्यक्तींच्याबाबतीत दहेज किंवा मेहर यांचा समावेश होत नाही.
कायदेशीर तरतूद - शिक्षा-हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१ च्या कलम ३ अन्वये हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल कमीत कमी 5 वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते. तसेच कमीत कमी १५,००० रुपये अथवा अशा हुंडयाच्या मूल्याइतकी रक्कम यापैकी जी रक्कम जास्त असेल इतक्या रकमेची दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.
हुंडा मागण्याबद्दल शिक्षा - हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१ च्या कलम ४ अन्वये कोणत्याही व्यक्तीने हुंडा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे मागितल्यास त्यास कमीत कमी ६ महिने आणि जास्तीत जास्त २ वषापर्यंत कारावासाची आणि १०,००० रुपयांपर्यत दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.