नदीपात्रातील झाडे वाचवण्यासाठी वारकरीही उतरले मैदानात

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे... अशी अभंगवाणी रचणाऱ्या संत तुकोबारायांचे वंशज असलेले वारकरी पुण्यातील वृक्षतोडीविरोधात आवाज उठवणार आहेत. नदीपात्रातील झाडे तोडण्याच्या महापालिकेच्या भूमिकेवर वारकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून देहू आणि पंढरपूरमधील विविध वारकरी संघटना या विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sun, 30 Apr 2023
  • 06:36 am
वारकरीही उतरले मैदानात

नदीपात्रातील झाडे वाचवण्यासाठी वारकरीही उतरले मैदानात

नदीपात्रातील झाडे वाचवण्यासाठी उठवणार आवाज

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे... अशी अभंगवाणी रचणाऱ्या संत तुकोबारायांचे वंशज असलेले वारकरी पुण्यातील वृक्षतोडीविरोधात आवाज उठवणार आहेत. नदीपात्रातील झाडे तोडण्याच्या महापालिकेच्या भूमिकेवर वारकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून देहू आणि पंढरपूरमधील विविध वारकरी संघटना या विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.

वेताळ टेकडीवर होणारी झाडांची कत्तल आणि मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवनाच्या नावाखाली ६ हजार ६२ वृक्षांचा बळी जाणार असल्याने शहरातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यावरून शनिवारी (दि. २९) चिपको आंदोलनही करण्यात आले. ‘नैसर्गिकरित्या वाढलेली झाडे तोडू नका आणि पर्यावरणाच्या ऱ्हासास हातभार लावू नका,’ अशी भूमिका वारकऱ्यांकडून घेतली जात आहे.

तुकाराम महाराज देहू संस्थानचे विश्वस्त तथा तुकाराम महाराजांचे वंशज माणिक महाराज मोरे ‘सीविक मिरर’शी संवाद साधताना म्हणाले, ‘‘तुकाराम महाराजांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ हा संदेश दिला आहे. वारकरीही पुणे ते पंढरपूर दरम्यान हरितवारी करतात. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झटत असतात. महापालिकेनेही नदीपात्रातील झाडे तोडू नये. खरे तर विकासकामांना बाधा न होणारी कोणतीही झाडे तोडू नयेत. झाडे राखण्यावर आणि जोपासण्यावर भर द्यायला हवा. कोणताही अडथळा ठरत नसलेली नदीपात्रातील झाडे सुशोभीकरणासाठी तोडण्याची काहीच गरज नाही. आधीच पुण्यातील वातावरण दूषित झाले आहे. त्यात पुन्हा झाडेतोड नको. महापालिका म्हणते झाडांचे पुनर्रोपण करणार, पण त्याची हमी कोण घेणार? चांगली वाढलेली झाडे इतर ठिकाणी जगतील याची शाश्वती कमी आहे. त्यामुळे नदीपात्रातील झाडेतोडीला वारकरी संप्रदाय विरोध करेल.

‘‘तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून वनांची आणि तिथल्या वनचरांची थोरवी गायली आहे. नदीपात्रातील झाडांच्या कत्तलीचा विषय केवळ सहा हजार झाडांपुरता मर्यादित नाही. 

नदीपात्रात काँक्रिटीकरण केल्यास झाडांवर आणि नदीवर अवलंबून असलेली परिसंस्था धोक्यात येईल. एका झाडाभोवती किमान ५० जीव अवलंबून असतात. त्यामुळे तीन लाख जिवांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे,’’ असे ‘अंघोळीची गोळी’ या संस्थेचे अध्यक्ष माधव पाटील यांनी नमूद केले.

झाडांची अनावश्यक कत्तल रोखण्यासाठी 'पंढरपूर विठ्ठल रखुमाई संस्थान' चे सदस्य शिवाजी महाराज मोरे, महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे चंद्रकांत महाराज वांजळे,  संत ज्ञानेश्वर माउलींचे वंशपरंपरागत चोपदार राजाभाऊ चोपदार, जोग वारकरी शिक्षण संस्थेचे तुकाराम महाराज, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे संपर्क प्रमुख विनोद महाळुंगकर, वारकरी दर्पणचे सचिन महाराज पवार यांनीही वृक्ष चळवळीला पाठिंबा दिला आहे. पुणे महापालिकेला एकही झाड तोडू देणार नाही. वेळ पडली तर सर्व वारकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असे आश्वासन वारकऱ्यांनी दिल्याचे माधव पाटील यांनी सांगितले.

काय आहे नदी पुनरुज्जीवन?

मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवित करण्यासाठी ११ टप्प्यांमध्ये काम केले जाणार आहे. त्यासाठी पाच हजार कोटींहून अधिक खर्च केला जाणार आहे. त्या अंतर्गत संगम ब्रिज ते मुंढवा दरम्यानच्या कामांना गेल्या वर्षी सुरुवात झाली आहे. हे काम तीन टप्प्यांत होणार आहे. त्या अंतर्गत होणाऱ्या कामामुळे नदीच्या दोन्ही काठांना असलेल्या ६ हजार ६२ वृक्षांना बाधा पोहोचणार आहे. त्यातील ३ हजार ११० वृक्ष तोडले जाणार आहेत, तर ४ हजार ४२९ वृक्षांचे पुनर्रोपण केले जाणार आहे. बाधित होणाऱ्या वृक्षांच्या बदल्यात ६५ हजार ४३४ वृक्ष लावण्यात येणार असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. त्याचबरोबर नदीकाठची परिसंस्था सुधारण्यासाठी नदीच्या दोन्ही काठांवर मोठ्या प्रमाणावर झुडपांची लागवड करण्यात येणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story