वाकड आणि हिंजवडीच 'अलर्ट'?
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
शहरात दररोज किमान पाच वाहने चोरीला जातात. मात्र, चोरीला गेलेल्या वाहनांचा तपास गुन्हे शाखा आणि वाकड, हिंजवडी पोलिसांनाच लागत आहेत. त्यामुळे अन्य पोलिसांकडून चोरीच्या वाहनांचा शोध का लागत नाही, असा प्रश्न पोलीस खात्यासमोर निर्माण झाला असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील याबाबत चौकशी सुरू केली आहे. शहरात ठराविक ठाण्यातील पोलीसच काम करताहेत का, असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.
वाहनचोरी हा सध्या राज्यातील सर्व पोलिसांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. अनेकांनी पै-पै गोळा करून वाहने खरेदी केल्यावर काही दिवसांतच चोरट्यांकडून त्यांची चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मध्यंतरी वाकड पोलिसांनी बीड जिल्ह्यात मुक्काम ठोकून ४३ चोरीची वाहने जप्त केली होती. गुन्हे शाखेच्या विविध पथकांकडून शहरातून चोरीला गेलेली वाहने विदर्भ-मराठवाडा आणि मुंबई परिसरातून जप्त करण्यात आली आहेत. तसेच, शहरातून वाहने चोरून ती अन्य राज्यात विक्रीसाठी नेणाऱ्या टोळीला राज्याच्या सीमेवर ताब्यात घेतले होते.
वाकड आणि हिंजवडी पोलीस ठाण्यातील तपास पथकांनी केलेल्या कामगिरीतून शहरातील अनेक वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तर, गुन्हे शाखेने केलेल्या तपासातून शहरासह ग्रामीण आणि पुणे शहरातील वाहनचोरीचे काही गुन्हे उघडकीस आले होते. मात्र, अन्य पोलीस ठाण्यातील तपास पथके आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी काय करत आहेत, असा सवाल आता पोलीस दलातच उपस्थित होऊ लागला आहे. मध्यंतरी झालेल्या तपासातून रावेत - १, निगडी – ११, पिंपरी – ११, देहूरोड – २, हिंजवडी – ५, भोसरी एमआयडीसी – १ अशा स्वरूपात वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले होते.
शहरातून होणारी वाहन चोरी रोखण्याची जबाबदारी स्थानिक पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांची आहे. त्याचबरोबर या गुन्ह्यांचा तपास लागावा यासाठी साहायक पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी आवश्यक उपाययोजना संबंधित पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून राबवून घेण्याची गरज आहे.
शहरातील हिंजवडी आयटी पार्क तसेच ग्रामीण भागातील चाकण-मावळ पट्ट्यातून वाहनांची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. इमारतींच्या पार्किंगमधून, रस्त्यावरून, उड्डाणपुलाखालून वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. हिंजवडी आयटी पार्क परिसरातील अभियंते आणि अन्य कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती करण्यात आली असून, हेल्मेट नसणाऱ्यांची वाहने कंपनीच्या आवारात घेतली जात नाहीत, तर काही कंपन्यांनी सरसकटपणे दुचाकी कंपनीच्या आवारात घ्यायचीच नाहीत असा फतवा काढल्याने ही सर्व वाहने रस्त्यावर लावण्यात आलेली असतात. परिणामी या भागातून वाहन चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याचबरोबर एमआयडीसी भागातून वाहनांची चोरी होण्याचे प्रमाण अधिक आहे. एमआयडीसी भागातील बऱ्याच रस्त्यांवर विद्युत पुरवठा खंडित झालेला असतो. तसेच बराचसा भाग हा निर्मनुष्य असल्याने येथून वाहन चोरीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
नाकाबंदीची गरज
सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे शहराचे एंट्री-एक्झिट पाँईटवर होणारी पूर्वीची नाकाबंदी आता होताना दिसत नाही. त्याचबरोबर शहराच्या याच प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने चोरीला गेलेली वाहने जातात कुठे हेच समजत नाही. पूर्वी, चांदणी चौक, मोशी टोलनाका, मुकाई चौक रावेत, भक्ती-शक्ती चौक, निगडी आदी ठिकाणी नाकाबंदी केली जात होती. यासह शहरात (पिंपरी-चिंचवड) प्रवेश करणारी एकूण ६ ठिकाणे होती. नियंत्रण कक्षाकडून निरोप मिळताच एक अधिकारी पाच कर्मचारी बॅरिकेड्स घेऊन ठरलेल्या चौकात पोहोचत होते. त्यानंतर तेथून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची नोंद ठेवली जात होती. त्यामुळे शहरातील वाहन चोरी तसेच अन्य अनेक प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसत होता. पिंपरी-चिंचवडमध्ये बाहेरील राज्यातून नोकरीसाठी आलेल्या आणि येथील स्थानिक अशी एकंदरीत लोकसंख्या आणि वाहनसंख्या पाहता रस्त्यावर वाहने चोरीला गेल्याचे पटकन लक्षात येत नसल्याचे तसेच अनेकदा एखादे वाहन अन्य कोणीतरी घेऊन जात असल्याने समजून येत नाही असे काही निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नाकाबंदी पुन्हा सुरू व्हावी. सीसीटीव्ही जागोजागी बसवण्यात यावेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.