'लखोबा'च्या लफड्यांचा 'वाजला बँड'
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
तोतया आयएएस अधिकारी विनय देव ऊर्फ वासुदेव निवृत्ती तायडे या 'लखोबा लोखंडे'ने फसवणूक केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. शेतकऱ्याकडून सैनिकी शाळेचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी त्याने ४२ लाख रुपये घेतल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने याबाबत बुधवारी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मनीष ऊर्फ मेघेंद्र हेमकृष्ण कापगते (वय ४२, रा. साकोली, जि. भंडारा) असे फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तायडेने त्याला आपण पंतप्रधान कार्यालयात सचिव पदावर कार्यरत असल्याची खोटी बतावणी केली होती. आपली प्रशासनातील उच्च पदावरील व्यक्तींशी ओळख असल्याचे सांगून, त्याने नवीन सैनिकी शाळेचा प्रस्ताव मंजूर करून देतो असे आमिष फिर्यादी यांना दाखवले. त्यासाठी एक मे २०२२ ते २३ जुलै २०२२ या कालावधीत फिर्यादीकडून त्याने ४२ लाख रुपये घेतले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे शाळेची मंजुरी न देता, तसेच घेतलेले पैसेही परत न देता आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादींनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
यापूर्वी औंध परिसरातील सिंध हौसिंग सोसायटी येथे २९ मे रोजी औंध पुणे बाॅर्डर लेस वर्ल्ड फाऊंडेशन या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये रुग्णवाहिका लोकार्पण साेहळा आयाेजित करण्यात आला हाेता. जम्मू-काश्मीर येथे मदतीसाठी ती रुग्णवाहिका पाठवली जाणार होती. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून डाॅ. विनय देव हा व्यक्ती होता. तो आपण आयएएस अधिकारी असून, पंतप्रधान कार्यालयात सचिव पदावर गोपनीय काम करत असल्याचे सांगत होता. मात्र, त्याने सांगितलेल्या माहितीबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक विचारणा केली असता प्रमुख पाहुणा म्हणून आलेल्या तायडेच्या आयएएसपदाबाबत त्यांना संशय वाटला. त्यानंतर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर तो तोतया आयएएस असल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी आठ दिवसांपूर्वी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता तळेगाव दाभाडे येथेही गुन्हा दाखल करण्यात आला असून, अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.