थांबा, पाहा, जा...

कोणत्याही सामाजिक उपक्रमात नागरिकांना समाविष्ट करून घेतले तर त्याचा उद्देश नक्की साध्य होते. पुण्याला भेडसावणारी वाहतूक समस्या सोडवण्याचा प्रयत्न म्हणून एका वेगळ्या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल ‘ पुणे टाइम्स मिरर ’ चे आभार मानावे तेवढे थोडेच म्हणावे लागेल.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 29 Mar 2023
  • 11:30 am
थांबा, पाहा, जा...

थांबा, पाहा, जा...

सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीसाठी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे समस्त पुणेकरांना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

अर्चना मोरे / अमृता प्रसाद

feedback@civicmirror.in

कोणत्याही सामाजिक उपक्रमात नागरिकांना समाविष्ट करून घेतले तर त्याचा उद्देश नक्की साध्य होते. पुण्याला भेडसावणारी वाहतूक समस्या सोडवण्याचा प्रयत्न म्हणून एका वेगळ्या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल ‘ पुणे टाइम्स मिरर ’ चे आभार मानावे तेवढे थोडेच म्हणावे लागेल. सकारात्मक भूमिकेतून पुणेकरांनी, समाजातील सर्व स्तरांनी एक पाऊल पुढे टाकून या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सोमवारी केले. सुरक्षित वाहतुकीसाठीच्या ‘सीविक मिरर’, ‘ पुणे टाइम्स मिरर ’ आणि ‘पुणे शहर वाहतूक पोलीस ’ यांच्या‘ जरा देख के चलो ’ या संयुक्त उपक्रमाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. 

वन ८ कम्युन, द मिल्स, ५ राजा बहादूर रोड येथे ‘ जरा देख के चलो ’ चे उद्घाटन झाले.   

पुणे पोलीस दल आणि वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आमदार, सन्माननीय नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवकांच्या उपस्थितीत झाले.  

प्रमुख अतिथी म्हणून पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, शहर वाहतूक उपायुक्त विजय मगर, पोलीस विभाग दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर, बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील ‘ पुणे टाइम्स मिरर ’ आणि ‘सीविक मिरर’ चे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक पंकज शर्मा, ‘ पुणे टाइम्स मिरर ’ चे उपाध्यक्ष नीरज शर्मा, सेलेबिलीटीचे संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी अभिषेक मिश्रा, राजा बहादूर इंटरनॅशनल लि. चे उपाध्यक्ष उमंग पित्ती, न्याती समूहाचे एचआर प्रमुख दीपक पाठक, अभिनेते सौरभ गोखले, पुणे भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस करण मिसाळ आदींनी या आगळ्या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा आणली.

प्रमुख अतिथी रितेश कुमार आणि अन्य सन्माननीय अतिथींच्या सत्काराने कार्यक्रमास प्रारंभ झाला. रितेश कुमार यांनी दीप प्रज्वलन केल्यावर उपक्रमाचे उद्घाटन झाले. त्यानंतर पोलीस वाद्यवृंदाच्या 

सूर-तालाच्या नादामध्ये सारे वातावरण आणि उपस्थित भारावून गेले. 

आयुक्त रितेश कुमार म्हणाले की, वाहनांची सर्वाधिक संख्या आणि घनता असलेल्या शहरांमध्ये पुण्याचा समावेश होतो. वाहतूक समस्येच्या विळख्यात अडकलेल्या पुण्यातील वाहतूक सुरळीत, सुलभ होण्यासाठी ‘ जरा देख के चलो ’ हा उपक्रम उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे या उपक्रमात जास्तीत जास्त पुणेकरांनी सहभागी व्हावे. 

आयुक्तांच्या भावनांशी सहमती दर्शवताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, वाहतूक समस्या ही केवळ पुण्यापुरती मर्यादित नसून ती जगभर जाणवते. मात्र, तुम्ही जेव्हा पुण्यातील वाहतूक पाहता त्यावेळी शहरातील लोकांपेक्षा वाहनांची संख्या पाचपटीने अधिक असल्याचे जाणवते. वाहतूक कोंडीची तीव्रता कमी करण्यासाठी प्रत्येकाने मेट्रो, पीएमपीएल या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करायला हवा. प्रस्तावित रिंग रोड, मेट्रो, पीएमपीएल बस सेवेमुळे वाहतूक समस्या सुटू शकते. वाहतुकीच्या कोंडीमुळे मी नेहमी स्कूटरचा वापर करतो. त्यामुळेच मतदार मला दुचाकीवरचा आमदार या नावाने ओळखतात. वाहतूक समस्येवर मार्ग काढण्यासाठीचा हा उपक्रम कौतुकास्पद असून त्यामध्ये समस्त पुणेकरांनी सहभागी व्हावे. 

सुलभ वाहतुकीसाठीच्या उपक्रमाचे कौतुक करताना शहर वाहतूक उपायुक्त विजय मगर म्हणाले की, ‘ जरा देख के चलो ’ उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्याचबरोबर त्यांना जबाबदारीचीही जाणीव होईल. वाहतूक प्रश्नांबद्दल आम्हाला अनेक ट्विट येतात, अनेक तक्रारीही येतात. आपण कोणत्याही सामाजिक उपक्रमात नागरिकांना, समाजाला सहभागी करून घेतो, तेव्हा त्याच्या यशाची खात्री असते. शहरातील ३० मोक्याच्या  सिग्नल चौकांवर निवडक सेलेब्रेटीज, उद्योजक आणि नागरिकांच्या सहकार्याने महिनाभर हा उपक्रम आपण चालविणार आहोत. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ‘सीविक मिरर’, ‘ पुणे टाइम्स मिरर ’ने घेतलेल्या पुढाकाराबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.   

या वेळी ‘ पुणे टाइम्स मिरर ’ चे उपाध्यक्ष निरज शर्मा म्हणाले की, आपले जीवन हे महत्त्वाचे असून जीवनातील प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेतला पाहिजे. पुण्याच्या दृष्टीने अभिमानाच्या असलेल्या ‘ जरा देख के चलो ’ या उपक्रमात पुणेकरांनी सहभागी व्हावे. महिनाभराच्या उपक्रमात सहभागी झालेल्यांनी भविष्यात आपल्या अनुभवात इतरांना सहभागी करून घ्यावे.       

कायदा-सुव्यवस्था, शिक्षण-आरोग्य आणि वाहतूक या तीन मूलभूत बाबींवर प्रत्येक शहराचा चेहरा बनतो असे स्पष्ट करून  ‘ पुणे टाइम्स मिरर ’ आणि ‘सीविक मिरर’ चे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक पंकज शर्मा  म्हणाले की, प्रत्येक शहरातील वाहतूक आणि परिवहन व्यवस्था सुलभ असायला हवी. तसेच त्याचे व्यवस्थापन मजबूत असायला हवे. पुणे मेट्रोने या उपक्रमात सहभागी व्हायला हवे होते. भविष्यात ते या उपक्रमात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. पुणे वाहतूक पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता आहे याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, अशा स्थितीतही ते त्यांचे काम चांगल्या पद्धतीने करत आहेत. प्रसार माध्यमातील एक घटक म्हणून आम्ही ‘पुणे शहर वाहतूक पोलीस ’ यांच्या सहकार्याने ‘ जरा देख के चलो ’ हा उपक्रम राबवत आहोत. या काळात आम्हाला चुका जाणवतील, प्रश्न समोर येतील, मात्र त्याचबरोबर काही उत्तरेही मिळतील. या उपक्रमात जबाबदार पुणेकर, उद्योजक, समाजातील अन्य घटक सहभागी होतील अशी आम्हाला खात्री आहे.    

‘ जरा देख के चलो ’ उपक्रमात सहभागी होण्याचे पुणेकरांना आवाहन करताना अभिनेते सौरभ गोखले म्हणाले की, गेली ३०-३५ वर्षे मी पुण्यात राहात असून गेल्या काही दशकांत पुण्यातील वाहतूक समस्येने उग्र स्वरूप धारण केले आहे. अनेक वेळा माझ्याकडून नियमांचे उल्लंघन झाल्याने मी देखील दंड भरलेला आहे. ‘ जरा देख के चलो ’ उपक्रमाबरोबर वाहतूक पोलिसांना कोणत्या स्थितीत काम करावे लागते, त्यांच्या समस्या, कामाची स्थिती आदी बाबींवर प्रकाश पडला पाहिजे. आपल्यासमोर आव्हाने आहेत हे खरं, त्याचबरोबर त्यांना सामोरे जाणे ही आपली जबाबदारी आहे. भविष्यातील अशा उपक्रमात वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टी आपले योगदान उचलेल.  

पुणे भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस करण मिसाळ म्हणाले की, आम्ही केलेल्या पाहणीनुसार जगातील सर्वाधिक कोंडीच्या शहरामध्ये पुण्याचा समावेश होतो. वाढते उद्योग, मूलभूत सुविधा, अतिक्रमण, पदपथ, अरुंद रस्ते अशा काही कारणांमुळे पुण्यातील वाहतुकीची समस्या तयार झालेली आहे. आरटीओचे परवान्याचे नियम अधिक कडक झाले तर नागरिकांमध्ये वाहन चालविण्याची जाणीव तयार होईल.    

गेल्या दोन आठवड्यांपासून  ‘सीविक मिरर’, ‘ पुणे टाइम्स मिरर ’ आणि ‘पुणे शहर वाहतूक पोलीस ’ यांच्या ‘ जरा देख के चलो ’ या संयुक्त वाहतूक सुरक्षा उपक्रमाच्या माध्यमातून पुण्याला भेडसावणाऱ्या वाहतूक समस्यांबाबत योग्य वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. वाहतूक पोलिसांना मदतीचा अल्पसा हात देण्यासाठी पुणेकरांनी एक पाऊल पुढे टाकावे हा यामागचा उद्देश होता. वर्दळीच्या ३० सिग्नलवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही मोहीम सुरू केल्यापासून पुणेकरांनी स्वयंस्फूर्तीने नाव नोंदवण्यासाठी मोठा प्रतिसाद दिला. ई-मेल, फोन आणि संदेशांद्वारे मोठ्या संख्येने जबाबदार पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद भारावून टाकणारा होता, आम्हाला अधिकाधिक प्रेरणा देणारा होता, तसेच आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचा विश्वास दृढ करणारा होता.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story