Ragging : रॅगिंगला कंटाळून 'विधी'च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मराठवाडा मित्र मंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयातील एका २२ वर्षीय विद्यार्थ्याने रॅगिंगला वैतागून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत त्याच्या सोबत शिकणाऱ्या वर्गमित्राकडून सतत होणाऱ्या मानसिक छळाला वैतागून अखेर त्याने गळफास लावून घेत जीवन संपवत असल्याचे लिहिले आहे.

रॅगिंगला कंटाळून 'विधी'च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

रॅगिंगला कंटाळून 'विधी'च्या विद्यार्थ्याची आत्महत्या

विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहात घेतला गळफास

अर्चना मोरे/यशपाल सोनकांबळे

feedback@civicmirror.in

मराठवाडा मित्र मंडळाच्या शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयातील एका २२ वर्षीय विद्यार्थ्याने रॅगिंगला वैतागून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत त्याच्या सोबत शिकणाऱ्या वर्गमित्राकडून सतत होणाऱ्या मानसिक छळाला वैतागून अखेर त्याने गळफास लावून घेत जीवन संपवत असल्याचे लिहिले आहे. गोखलेनगर येथील विद्यार्थी सहायक समितीच्या पी. डी. कारखानीस वसतिगृहातील राहत्या खोलीत ९ मे रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गळफास लावून घेतला. चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

राज गर्जे असे आत्महत्या केलेल्या या विद्यार्थ्यांचे नाव आहे.  तो मूळचा बीड जिल्ह्यातील पाटस (आष्टी) या गावचा रहिवासी असून विधी पदवी शिक्षणासाठी ३ वर्षांपासून पुण्यात आला होता. राज याचे वडील रावसाहेब प्रल्हाद गर्जे (वय ४९) यांनी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी निरुपम जयवंत जोशी (वय आणि पत्ता नमूद नाही) याच्यावर भारतीय दंड विधानातील ३०६ व महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायदा १९९९ कलम ३१८(२३) अन्वये  गुन्हा दाखल केला आहे. या कलमानुसार आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या दोषी व्यक्तीस दहा वर्ष किंवा त्याहून अधिक कारावासाची शिक्षा आणि आर्थिक दंडाची शिक्षा होते.

रावसाहेब गर्जे हे शेतकरी आहेत. त्यांना तीन मुले आहेत. त्यांचा मुलगा राज हा मागील तीन वर्षांपासून पुण्यात मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयात एलएलबी शिक्षणासाठी राहात होता. त्याला कायद्याचे शिक्षण पूर्ण करायचे होते. ९ मे रोजी राजने अचानक वसतिगृहात आत्महत्या केल्याचे त्याच्या वडिलांना समजताच ते नातेवाईकांसह औंध जिल्हा रुग्णालयात पोहचले. तेथे डॉक्टरांनी राज याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

घटनेच्या दिवशी त्याच्या वडिलांनी राजला संध्याकाळी ७ च्या सुमारास फोन केला होता. त्यावेळी वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने फोन करून त्यांना कळवले की, राजने खोलीत गळफास लावून घेतला असून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहेत. राजच्या खोलीतून एक सुसाइड नोट सापडली आहे, ज्यामध्ये त्याने निरुपम जयवंत जोशीने आपला मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्याने जीवन संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले होते. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती चतुःश्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे 

यांनी दिली.

राजचे त्याच्या मित्रासोबत आर्थिक विषयावरून वाद होते, अशी माहिती वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे. वसतिगृह व्यवस्थापनाने पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिले आहे. वसतिगृह व्यवस्थापनाचा या दुर्घटनेशी काही संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयात अँटी रॅगिंग सेल नाही. रॅगिंग विरोधी समितीचे संपर्क क्रमांक आणि सदस्य दर्शवणारे कोणतेही सूचनाफलक लावलेले नाहीत, जे कायद्यानुसार अनिवार्य असतात, अशी माहिती राजच्या काही वर्गमित्रांनी दिली आहे. राजचे वडील रावसाहेब प्रल्हाद गर्जे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मात्र ते उपलब्ध झाले नाहीत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story