लांबपल्ल्यासाठी ‘लोकल’चा बळी

रेल्वे प्रशासनाने विशिष्ठ वेळेतील लोणावळा लोकल पुणे रेल्वे स्थानकाऐवजी शिवाजीनगर स्थानकातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आता प्रवाशांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. लांबपल्ल्याच्या प्रवाशांसाठी लोणावळा लोकलचा बळी देण्यात आल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Thu, 23 Feb 2023
  • 02:19 am
लांबपल्ल्यासाठी ‘लोकल’चा बळी

लांबपल्ल्यासाठी ‘लोकल’चा बळी

लोणावळा लोकल आता शिवाजीनगर स्थानकातून सोडण्याचा निर्णय; चाकरमाने, विद्यार्थीवर्गाला फटका

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

रेल्वे प्रशासनाने विशिष्ठ वेळेतील लोणावळा लोकल पुणे रेल्वे स्थानकाऐवजी शिवाजीनगर स्थानकातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर आता प्रवाशांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. लांबपल्ल्याच्या प्रवाशांसाठी लोणावळा लोकलचा बळी देण्यात आल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

शिवाजीनगर स्थानकात लोकलसाठी नव्याने बनविण्यात आलेल्या फलाटाच्या नावाखाली रेल्वेकडून प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका होत आहे. केवळ लांबपल्ल्याच्या गाड्यांचा त्रास कमी व्हावा, स्थानकातील गर्दी कमी व्हावी, या उद्देशानेच पुणे स्थानकातील लोकल कमी केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.

कोविडनंतर पुणे ते लोणावळादरम्यान लोकलच्या ४० फेऱ्या होत होत्या. त्यातून दररोज ८० ते ९० हजार प्रवासी प्रवास करत. आता रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर स्थानकात खास लोकल गाड्यांसाठी नवीन फलाट तयार केला आहे. या फलाटातून काही गाड्या सोडण्यात सुरूवात केली आहे. सध्या सहा गाड्या सोडण्यात येत आहेत. पण या लोकल पूर्वी पुणे स्थानकातून सुटत होत्या. त्यांच्याजागी दुसरी लोकल सुरू न करता संपूर्ण सेवाच शिवाजीनगरमधून सुरू केल्या आहेत. या फटका पुणे स्थानकातून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. काही लोकल या कार्यालयीन वेळेदरम्यान धावत होत्या. त्याच गाड्या हलविल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली आहे.

बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. सोमनाथ सलगर हे दररोज लोकलने प्रवास करतात. पुणे स्थानकातून काही लोकल हलविल्याचा फटका त्यांनाही बसला आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘माझ्या कामाची वेळ सकाळी आठची असल्याने मी त्यानुसार लोकलने आकुर्डीतून पुणे स्थानकापर्यंत येत होतो. पण ही लोकल आता शिवाजीनगरपर्यंत धावते. तर सायंकाळी सव्वापाचला सुटणारी लोकल शिवाजीनगरमधून धावते. त्यामुळे पुढील लोकलसाठी तासभर थांबावे लागते. या गाड्या कार्यालयीन वेळेतल्या असल्याने त्याला प्रवाशांची गर्दी होती. नेमक्या याच गाड्या शिवाजीनगरला हलविल्याने गैरसोय होत आहे.’’ महाविद्यालयात येणारे अनेक विद्यार्थी तसेच इतर कर्मचारी लोकलने प्रवास करतात. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे त्यांच्याही वेळेचे नियोजन कोलमडले आहे.

पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात ससून रुग्णालय, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयासह इतर शाळा-महाविद्यालये, खासगी रुग्णालये अनेक शासकीय तसेच खासगी कार्यालये आहेत. दररोज हजारो कर्मचारी लोकलने प्रवास करतात. पण कार्यालयीन वेळेतील लोकल बंद झाल्याने सर्वांचीच गैरसोय होऊ लागली आहे. खासगी नोकरी करणाऱ्या निकिता ओगले यांनीही रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. ‘‘कार्यालयीन वेळेतील लोकल बंद केल्याने शिवाजीनगरला जाऊन लोकल पकडणे खूपच त्रासदायक आहे. त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार व्हायला हवा,’’ अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही ठोस अभ्यासाशिवाय या लोकल शिवाजीनगर स्थानकात हलविल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. चार लोकल या सायंकाळी आणि रात्रीच्या वेळेत सुटणाऱ्या होत्या. याच वेळेत पुणे रेल्वे स्थानकातून उत्तरेकडील राज्यांत जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या सुटतात. या गाड्यांना नेहमीच गर्दी असते. त्यामुळे रात्री प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यात लोकल गाड्यांची भर पडल्याने गर्दी वाढते. त्यामुळे हा ताण कमी करण्यासाठी प्रशासनाने या वेळेतील गाड्या शिवाजीनगरला हलविल्या आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवाशांचा त्रास कमी होण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story