‘वंदे भारत’ प्रवाशांना नाही ‘पाव’ली
राजानंद मोरे
वंदे भारत एक्स्प्रेसमधून आरामदायी प्रवास आणि चवदार खाद्यपदार्थांची मेजवानी असल्याचा दावा रेल्वेकडून केला जात आहे. मागील चार दिवस प्रवाशांकडून गाडीचे कौतुकही करण्यात आले, पण काही प्रवाशांचा पहिल्या दिवशी खानपानावरून हिरमोड झाल्याचे समोर आले आहे.
शनिवारी (दि. ११) सोलापूरहून निघालेल्या वंदे भारतमध्ये अनेक प्रवाशांनी सकाळी नाश्त्याला नॉन व्हेज मेन्यूचा पर्याय निवडला होता, पण प्रत्यक्षात त्यांच्या ताटात व्हेज पदार्थ आले. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि. १०) मुंबईतून सोलापूर आणि शिर्डी या दोन वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखविला. गाडीमध्ये सकाळी चहा आणि नाश्ता दिला जातो. तिकीट काढतानाच त्याबाबत रेल्वे प्रवाशांना पर्याय दिला जातो. त्यानुसार व्हेज किंवा नॉन व्हेज पर्याय निवडावा लागतो. त्याप्रमाणे गाडीमध्ये प्रवाशांना सेवा पुरविण्यात येते.
इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (आयआरसीटीसी) खासगी ठेकेदारामार्फत ही सुविधा दिली जाते. तर रात्री जेवणाची व्यवस्था आहे. त्यावेळीही व्हेज-नॉन व्हेज असा पर्याय आहे.
शनिवारी सोलापूर स्थानकातून वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. त्यानंतर तिकीट काढण्यावेळी प्रवाशांनी निवडलेल्या पर्यायानुसार अनेकजण नॉन व्हेज नाश्त्याची वाट पाहात होते. पण त्यांच्यासमोर व्हेज पदार्थ आले. नॉन व्हेज नाश्ता नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. पुण्यामध्ये गाडीत बसलेल्या प्रवाशांनाही व्हेज डिश देण्यात आली.
त्यामध्ये चहा, केक, दूध पावडर, दूध, बिस्कीट असा मेन्यू होता. नॉन व्हेजमध्ये प्रवाशांना ऑम्लेट आणि ब्रेड मिळणे अपेक्षित होते. मात्र त्यांना व्हेज नाश्त्यावरच समाधान मानावे लागले.
वंदे भारतने पुणे-दादर असा प्रवास केलेल्या कार्तिक माने यांनाही हाच अनुभव आला असून याबाबत त्यांनी तक्रार केली आहे. प्रवासादरम्यान केलेल्या तक्रारीत ते म्हणतात, ‘‘मी वंदे भारतने पहिल्यांदाच प्रवास करत आहे. सकाळी नाश्त्यासाठी नॉन व्हेजचा पर्याय निवडला होता, पण व्हेज नाश्ता मिळाला. केकही प्युअर व्हेज होता. माझ्या ‘सी-आठ’ या कोचमधील कुणालाच नॉन व्हेज नाश्ता मिळाला नाही.’’ याबाबत आयआरसीटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सुरुवातीला त्यांनी असे काहीही घडले नसल्याचे सांगितले. पण अधिक माहिती घेतल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.
सोलापूरहून निघालेल्या गाडीमध्ये अंडी होती पण त्यासोबत दिले जाणारे ब्रेड मिळाले नाही. ब्रेड नसल्याने प्रवाशांना ऑम्लेट देता आले नाही.
आयआरसीटीसीच्या पुणे विभागाचे संचालक गुरुराज सोना यांनी सांगितले की, ‘‘सोलापूरमधून गाडी निघाली तेव्हा ब्रेड नसल्याने व्हेज नाश्ता देण्यात आला. पुण्यामध्ये ब्रेडची व्यवस्था करण्यात आली. तिथून पुढे मागणीप्रमाणे प्रवाशांना ब्रेड ऑम्लेट देण्यात आले. तोपर्यंत सर्व प्रवाशांना व्हेज नाश्ता देण्यात आला. याबाबत आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. पण याबाबत एकाही प्रवाशाची तक्रार आमच्यापर्यंत आलेली नाही.’’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.