व्हीआयपींची बडदास्त, प्रवासी वाऱ्यावर

पुण्यात कोथरूडमध्ये नुकत्याच झालेल्या एका खासगी कार्यक्रमासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने तब्बल १४० बस भाडेतत्त्वावर दिल्याचे समोर आले आहे. गर्दीच्या वेळेत म्हणजेच सायंकाळी या बस देण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. तर दुसरीकडे बसभाड्यातून पीएमपीला सुमारे साडे आठ लाख रुपये मिळाले. या दिवशी प्रवाशांची गर्दी नसल्याचे सांगत प्रशासनाकडून आता सारवासारव केली जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Wed, 8 Feb 2023
  • 01:25 pm
व्हीआयपींची बडदास्त, प्रवासी वाऱ्यावर

व्हीआयपींची बडदास्त, प्रवासी वाऱ्यावर

साडेआठ लाखांच्या भाड्यासाठी गर्दीच्या वेळी खासगी कार्यक्रमासाठी पीएमपीने दिल्या १४० बस, शहरभर प्रवाशांचे हाल

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@rajanandmirror

पुण्यात कोथरूडमध्ये नुकत्याच झालेल्या एका खासगी कार्यक्रमासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने तब्बल १४० बस भाडेतत्त्वावर दिल्याचे समोर आले आहे. गर्दीच्या वेळेत म्हणजेच सायंकाळी या बस देण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. तर दुसरीकडे बसभाड्यातून पीएमपीला सुमारे साडे आठ लाख रुपये मिळाले. या दिवशी प्रवाशांची गर्दी नसल्याचे सांगत प्रशासनाकडून आता सारवासारव केली जात आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि विविध शैक्षणिक तसेच इतर संस्थांनी संयुक्तपणे शनिवारी (दि. ४) ‘एज्यु यूथ मिट’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कोथरूडमधील सूर्यकांत काकडे फार्म्समध्ये सायंकाळी ६ ते ९ या वेळेत हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सुमारे एक लाख विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पुणे विद्यापीठाने याबाबत परिपत्रक काढून सर्व संलग्न महाविद्यालयांना अधिकाधिक विद्यार्थ्यांना सहभागी करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. या कार्यक्रमाला श्री श्री रविशंकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हेदेखील उपस्थित होते.

कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना नेण्यासाठी विविध शैक्षणिक संस्थांनी पीएमपीकडे बसची मागणी केली होती. कार्यक्रमाची वेळ सायंकाळची असूनही पीएमपी प्रशासनाने एकाच वेळी १४० बस देण्यास संमती दिली. या शैक्षणिक संस्थांमध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला १५, पुणे महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाला दोन, डीवाय पाटील युनिटेक सोसायटीला शंभर यांसह विविध महाविद्यालयांना बस पुरविण्यात आल्या होत्या. या बस पीएमपीच्या दुसऱ्या शिफ्टमध्ये म्हणजे दुपारी दोननंतर महाविद्यालयांना देण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत बस आगारामध्ये दाखल झाल्या नव्हत्या. यातून पीएमपीला सुमारे साडे आठ लाख रुपयांचा महसूल मिळाला.

एकाचवेळी १४० बस भाडेतत्त्वावर देण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. एकीकडे बस कमी असल्याने मार्गावर जादा बस सोडता येत नाहीत. बसचे ब्रेकडाऊन किंवा अपघात झाल्यानंतर त्या मार्गावर जादाची बस येत नाही. मात्र कार्यक्रमासाठी १४० बस दिल्याचे समोर आल्याने आता नाराजीची सूर उमटू लागला आहे. त्या दिवशी सायंकाळी मार्गावर ७० ते ८० बस कमी होत्या. ‘‘शनिवारी प्रवाशांची गर्दी कमी असते. मार्गावरही गाड्या कमी असतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली नाही,’’ असा दावा पीएमपी प्रशासनाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात उपलब्ध माहितीनुसार दर शनिवारी पीएमपीकडून १६२५ ते १६५० बस मार्गावर सोडल्या जातात. ४ फेब्रुवारी रोजी ३१ बस मार्गावरच बंद पडल्या. त्यामुळे प्रत्यक्षात मार्गावरील बस १५६० ते १५७० एवढ्याच होत्या. इतर दिवशी मार्गावर सुमारे १७२५ बस असतात.

मनपा ते वाघोली असा नियमित पीएमपी प्रवास करणारे विनय कुंभार या विषयी म्हणाले, ‘‘अनेकदा पीएमपी बससाठी मनपा स्थानकात बराच वेळ थांबावे लागते. वेळेत बस येत नाही. काही वेळा बस रद्द झाल्याची माहितीही मिळत नाही. त्यामुळे पीएमपीने अतिरिक्त बस असतील त्यावेळी मार्गावर सोडाव्यात. आधी प्रवाशांना प्राधान्य द्यायला हवे. भाडेतत्त्वावर बस देण्यास विरोध नाही. पीएमपीचा तोटा कमी व्हायला हवा. पण त्यासाठी मार्गावरील बस थांबवून खासगी कार्यक्रमासाठी देणे अत्यंत चुकीचे आहे. नियमित बस बंद करून प्रशासनाने पैशांसाठी प्रवाशांना वेठीस धरू नये.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story