सौदर्या
रोहित आठवले
rohit.athavale@civicmirror.in
TWEET@RohitA_mirror
निगडीतील रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलीने मला पैसे आणि खाऊ नको एक वही आणि पेन्सिल द्या अशी मागणी केल्याने तिच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार उघड झाला. एका शिक्षिकेने संवेदनशीलता दाखवत एका सामाजिक कार्यकर्तीशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने या मुलीची मंगळवारी (दि. १७) सुटका करण्यात आली. त्यानंतर तिच्या आईशी तिची भेट घडवत तिला माहेर या निवासी शाळेत दाखल करण्यात आले आहे. आता दहा वर्षांची असलेली ही मुलगी गेली पाच वर्षे रस्त्यांवर भीक मागत फिरत होती.
पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी सिग्नलवर भीक मागणारी लहान मुले दिसतात. याबाबत `सीविक मिरर`ने ``भिकाऱ्यांच्या मंडीवरील मूल कोणाचे`` ही बातमी प्रसिद्ध केली होती. शहर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलांचे आधारकार्ड तपासून संबंधित कुटुंबांकडेही चौकशी केली होती. यानंतर तीनच दिवसात शहराचा मुख्य चौक समजल्या जाणाऱ्या पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून एका चिमुरड्याचे अपहरण झाले होते. अपहरणकर्त्यांनी या लहान मुलाला शिरगाव येथे सोडून पळ काढला होता. अद्याप अपहरणकर्त्यांचा शोध लागलेला नाही.
एकीकडे हे सगळे सुरू असताना निगडी येथील भक्तीशक्ती चौकात भीक मागणाऱ्यांकडील एक मुलगी तिच्याच नातेवाईकांनी आईकडून पाच वर्षांपूर्वी पळवून आणली. तिला विविध जिल्ह्यात नेऊन भीक मागायला भाग पाडले जात असल्याचे उघड झाले आहे.
सौंदर्या हिचे आई-वडील काही वर्षांपूर्वी विभक्त झाले आहेत. त्यानंतर सौंदर्या हिच्यासह तिच्या भावाचा ताबा वडिलांकडे गेला होता, पण वडिलांनी दुसरे लग्न केले आणि मुले रस्त्यावर आली. तेव्हा सौंदर्या हिच्या वडिलांकडून असलेल्या काही नातेवाईकांनी दूरच्या नातेवाईकांना ही मुले देऊन टाकली.
सौंदर्या आणि तिच्या भावाला पैसे घेऊन विकले की कसे दिले हे तिच्या आईला समजले नव्हते. मात्र, मुले आता बापाकडे नसून रस्त्यावर भीक मागण्यासाठी विविध जिल्ह्यात फिरत असल्याचे समजले होते. तेव्हा तिने मुलाची सुटका करून घेत त्याला एका आश्रमात शिक्षणासाठी ठेवले, पण सौंदर्याचा शोध गेल्या पाच वर्षांपासून सुरू होता. आठ महिन्यांपूर्वी माय-लेकींची एका लग्नात भेट झाली होती. परंतु, पोटच्या पोरीला या लोकांच्या ताब्यातून तिच्या आईला घेऊन जाता आले नाही.
सौंदर्या आणि अन्य काही मुलांना सणावाराला शहरात आणून भीक मागायला लावले जात होते. त्यानंतर मजुरीसाठी गावागावात नेले जात होते. सौंदर्या हिला परत मिळविण्यासाठी तिची आई प्रयत्न करीत होती. त्यावेळी तिच्या आईला मुलीला संक्रांतीला पिंपरी-चिंचवडमध्ये पाठविले जाणार असल्याचे समजले. तसेच ती यापूर्वी सहा महिने आधी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन गेल्याचे समजल्याने तिच्या आईने प्राजक्ता रुद्रवार यांच्याशी संपर्क साधला होता.
दरम्यान, सौंदर्याचा फोटो सहा महिने आधी पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांना पाठविण्यात आला होता. रस्त्यावर सिग्नलला थांबल्यानंतर एका शिक्षिकेला सौंदर्याने वही आणि पेन्सिल भीक म्हणून मागितली होती. तसेच मला शिकायचे आहे, पण आम्ही काही दिवसात पुन्हा औरंगाबाद अथवा अहमदनगर येथील गावात राहायला जाणार असल्याचे सौंदर्याने त्या शिक्षिकेला सांगितले. दरवेळेस पैसे अथवा खायला मागणाऱ्या मुलांपैकी ही मुलगी काहीशी वेगळी असल्याचे शिक्षेकेला जाणवले. त्या शिक्षिकेने ही बाब सहगामी फाउंडेशनच्या प्राजक्ता रुद्रवार यांना सांगितली. त्यानंतर वही मागणारी मुलगी म्हणजेच सौंदर्या असल्याचे समजले. त्यानंतर सहगामी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्राजक्ता रुद्रवार आणि त्यांचे सहकारी सुधीर करंडे यांनी निगडी पोलिसांकडे धाव घेतली.
वरिष्ठ निरीक्षक रंगनाथ उंडे आणि निरीक्षक विश्वजित खुळे यांना घटनेची माहिती देऊन सौंदर्याला भीक मागणाऱ्या लोकांच्या तावडीतून सुटका करून पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मात्र, तेव्हा हे लोक सौंदर्या आमचीच मुलगी असल्याचे सांगत होते. तिचे आधारकार्ड दाखवत होते. परंतु, सौंदर्या हिचे तिच्या आईशी बोलणे करून दिल्यावर तिने पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तिला तात्पुरते एका सुधारगृहात ठेवण्यात आले. तसेच तिच्या आईला बोलावून घेण्यात आले. त्यानंतर बाल कल्याण विभागाने सौंदर्याचा ताबा तिच्या आईकडे दिला. परंतु, हे लोक सौंदर्याला घेऊन जाण्यासाठी मला मारतील अशी भीती तिच्या आईने व्यक्त केली. तसेच तिला शिकायचे असल्याने सौंदर्याला शाळेत घाला अशी विनंतीही तिच्या आईने केली. त्यानंतर पुण्यातील माहेर या संस्थेच्या निवासी शाळेत सौंदर्याला दाखल करण्यात आले.
आधारकार्डही बनवले
पोलिसांसह सामाजिक संस्थेतील कार्यकर्त्यांनी संबंधित मुलीची सुटका केल्यानंतरही तिचे पालकत्व पत्करलेले ती आमचीच मुलगी असल्याचे सांगत होते. इतकेच काय तर पुरावा म्हणून तिचे आधारकार्डही दाखवत होते. संबंधितांनी तिचे बनावट आधारकार्डही बनवले असल्याचे त्यावरून स्पष्ट होते.
सौंदर्याचा सहा महिन्यांपूर्वी आमच्या सारख्या राज्यभर काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडे फोटो आला होता. तसेच तिचा शोध आम्हीही घेत होतो. तेव्हा तिला सणावाराला शहरात आणून भीक मागायला लावले जात असल्याचे समजले होते. तेव्हापासून आम्ही लक्ष ठेवून होतो. अखेर सर्वांच्या प्रयत्नाने तिची सुटका करता आली.
- प्राजक्ता रुद्रवार, अध्यक्षा सहगामी फाऊंडेशन