विद्यापीठ कोंडी तज्ज्ञांच्या कोर्टात!

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील टोकाच्या वाहतूक कोंडीवर ‘सीविक मिरर’ने आयोजित केलेल्या चर्चेत विविध पयार्य सूचविण्यात आले. चर्चेत प्रख्यात उद्योजक आणि कायनेटिक समूहाचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता राजू ठाणगे, कनिष्ठ अभियंता सुमित यादव, प्रकल्प अधिकारी दर्शन बंब आणि पुणे महापालिकेचे वाहतूक नियोजन अधिकारी निखिल मिजार यांनी भाग घेतला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 21 Feb 2023
  • 03:22 pm
विद्यापीठ कोंडी तज्ज्ञांच्या कोर्टात!

विद्यापीठ कोंडी तज्ज्ञांच्या कोर्टात!

कोंडी फोडण्यासाठी पाहिजेत भुयारी तसेच दुचाकींसाठी स्वतंत्र मार्ग आणि सिग्नलविरहित चौक

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील टोकाच्या वाहतूक कोंडीवर ‘सीविक मिरर’ने आयोजित केलेल्या चर्चेत विविध पयार्य सूचविण्यात आले. चर्चेत प्रख्यात उद्योजक आणि कायनेटिक समूहाचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता राजू ठाणगे, कनिष्ठ अभियंता सुमित यादव, प्रकल्प अधिकारी दर्शन बंब आणि पुणे महापालिकेचे वाहतूक नियोजन अधिकारी निखिल मिजार यांनी भाग घेतला. सेनापती बापट रस्त्याकडून शिवाजीनगरच्या दिशेने जाण्यासाठी भुयारी मार्ग, गणेशखिंड रस्त्याला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर दुचाकींसाठी स्वतंत्र मार्गिका आणि सिग्नलविरहित चौकांमुळे भविष्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. 

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतिक्षित आणि उलटसुलट चर्चांनी गाजलेल्या दुमजली उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू आहे. पुलामुळे चौकातील पुढील पन्नास वर्षांची वाहतूक कोंडीची समस्या सुटेल, अशी आशा आहे. प्रकल्प आराखड्यात आणखी काही सुधारणा केल्यास सेनापती बापट रस्त्यावरील कोंडीवर मार्ग काढता येईल, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली. या रस्त्यावरून मुंबईच्या दिशेने ये-जा करणारी वाहने तसेच कोथरूड, कर्वेनगर आणि स्वारगेट भागात जाणाऱ्या वाहनांना त्याचा बराच फायदा होऊ शकतो.

‘सीविक मिरर’ने आयोजित केलेल्या चर्चेमध्ये प्रख्यात उद्योजक अरुण फिरोदिया यांनी विविध उपाययोजना सुचवल्या. पुढील काही दशकांमध्ये विद्यापीठ चौक आणि सेनापती बापट रस्त्यावर वाढणाऱ्या वाहनांचा विचार करून आताच कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, याबाबत त्यांनी आपली मते मांडली. जुना मुंबई-पुणे महामार्ग हा विद्यापीठ चौकापासून फार दूर नसल्याने या भागात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. दोन्ही शहरांना जोडणारा हा महत्त्वाचा  मार्ग असल्याचे फिरोदिया यांनी सांगितले. ते म्हणाले, आयटी क्षेत्रामध्ये झालेली वाढ आणि उपनगरांचा विकास वेगाने होत असल्याने गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीचा बोजा वाढत चालला आहे. त्यामुळे पुढील पन्नास वर्षांचा विचार करून या रस्त्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. या रस्त्यावरील वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यासाठी विद्यापीठ रस्ता आणि सेनापती बापट रस्त्याच्या नियोजनाचा प्राधान्याने विचार करायला हवा. कोणत्याही अडथळ्याशिवाय या दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक अत्यंत सुलभपणे होण्याच्या दृष्टीने नियोजन करणे अपेक्षित आहे. या मार्गावर कुठेही वाहतूक सिग्नल असू नयेत. अन्यथा वाहतूक कोंडी कमी करण्याचा उद्देश सफल होणार नाही, असे स्पष्ट मत फिरोदिया यांनी मांडले. 

ब्रेमेन चौकात पाहिजे भुयारी मार्ग   

ब्रेमेन चौकामध्येही स्पायसर कॉलेज रस्त्याकडून औंध पुलाच्या दिशेने भुयारी मार्ग करण्याचे फिरोदिया यांनी बैठकीत सुचविले. ‘पाषाण रस्त्यावर अनेक महाविद्यालय व शाळा असल्याने तीही एक मोठी समस्या आहे. नियोजन करताना मुलांच्या सुरक्षेलाही प्राधान्य द्यायला हवे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी भुयारी मार्ग किंवा पादचारी पुलांचा विचार करणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यापीठ चौकातून येणाऱ्या वाहनांमुळे त्यांना कसलाही त्रास होणार नाही,’ असेही फिरोदिया यांनी नमूद केले.

कोथरूड बोगद्याला होणारा विरोध अनाठायी 

उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर शासकीय तंत्रनिकेतनपासून राजभवनपर्यंत भुयारी मार्ग करण्याचे पुणे महापालिकेने प्रस्तावित केले आहे. पण या प्रकल्पाला भूसंपादनाची अडचण आहे. पालिकेने ४५ मीटर रस्त्याचे नियोजन केले असले तरी सध्या ३४ मीटर रस्ताचा उपलब्ध होत आहे. पालिकेचे वाहतूक नियोजन अधिकारी मिजार म्हणाले, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण खूपच कमी होईल. विद्यापीठ चौक आणि चांदणी चौक या दोन मोठ्या चौकांमध्ये कामे वेगाने सुरू आहेत. मुंबईकडून पुणे शहरात तसेच कोथरूडकडे जाण्यासाठी वाहनचालकांकडून विद्यापीठ रस्त्याचा वापर केला जातो. चांदणी चौकातील काम पूर्ण झाल्यानंतर गणेशखिंड रस्ता आणि सेनापती बापट रस्त्यावरील ताण आपोआप कमी होईल. बालभारती ते पौड रस्ता प्रकल्प आणि कोथरूड बोगद्याला मोठा विरोध होत आहे. शहरातील विकास होत असताना वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी अशा उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे लोकांनी समजून घ्यायला हवे, असे मिजार यांनी सांगितले.

मिजार यांनी सीओईपी, चांदणी चौक, स्वारगेट आणि येरवडा येथील मुख्य चौकांशिवाय नागरिकांना इतर मार्गांवर जाण्यास दुसरा पर्याय नसल्याचेही नमूद केले. आम्ही विविध पर्यायांचा अभ्यास केला असून विविध रस्ते एकमेकांना जोडल्यास, दोन रिंगरोडला जोडल्यास शहरातील वाहतूक कोंडीतून बऱ्यापैकी सुटका होऊ शकते, असा विश्वास मजार यांनी व्यक्त केला.

सर्वसमावेशक वाहतूक आराखड्याविषयी पीएमआरडीएचे कार्यकारी अभियंता ठाणगे म्हणाले, प्रत्यक्षात भूसंपादन झाल्यानंतर विविध मुद्द्यांवर स्पष्टपणे नियोजन करता येऊ शकते. नियोजनानुसार प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याला सध्या प्राध्यान्य आहे. उड्डाणपुलाची उंची कमी किंवा वाढविली जाणार नाही. दुचाकींसाठी स्वतंत्र मार्गिका हे यशस्वी मॉडेल असून प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर आम्हीही त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील राहू. आम्ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सखोल अभ्यास केला आहे. त्यानुसार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील कोंडीची समस्या निश्चितपणे खूप प्रमाणात कमी होईल, असेही ठाणगे यांनी स्पष्ट केले. 

या वेळी झालेल्या चर्चेतील पर्यायांच्या अनुषंगाने रस्त्यावरील वाहतुकीचा भार आणि प्रकल्पाच्या व्यावहारिकतेबाबत सखोल अभ्यास करण्याचे आश्वासन पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी दिले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story