फुलांचा हार आणि रांगोळीने सजवले रस्त्यावरील खड्डे
पुणे शहरातील विविध भागातील रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यातच अवघ्या महिन्याभरावर पावसाळा आला असतानाही रस्त्यांची कामे पुर्ण झालेली नाहीत. त्यामुळे संतापलेल्या पुणेकरांनी चक्का रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांना फुलांचा हार घालून महापालिकेचा निषेध करत अनोखे आंदोनल केले आहे.
पुण्यातील घोरपडी पेठ येथे असणाऱ्या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. त्यामुळे, स्थानिक नागरिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. खड्डे पडलेल्या रस्त्यांवर रांगोळी काढून त्यावर फुलांचा सडा टाकत पुणे महापालिकेचा निषेध व्यक्त केला जात आहे. महाराणा प्रताप सिंह रस्ता डॉक्टर विजय कदम चौक ते मक्का मशीद मोमीनपुरा येथे असणाऱ्या चांगल्या रस्त्याची दुरावस्था केली आहे, असा आरोपही येथील नागरिकांकडून केला जात आहे.
याविषयी बोलताना पुणे शहर राष्ट्रवादीचे सरचिटणीस गणेश कल्याणकर म्हणाले की, अनेकदा अधिकाऱ्यांकडे रस्ता दुरुस्त करण्यासाठी मागणी केली होती. मात्र रस्त्याचे काम अजूनही होत नसल्याने नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पाण्याच्या पाईपलाईनचे काम करायचे आहे असे सांगत या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. कोणत्याही प्रकारचे काम या ठिकाणी न करता विनाकारण या रस्त्यांची दुरावस्था करून ठेवल्याचे आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. लवकरात लवकर या रस्त्याचे काम झाले नाही तर या अधिक तीव्र आंदोलन करू, असा इशारा देखील यावेळी गणेस कल्याणकर यांच्यासह नागरिकांकडून प्रशासनाला देण्यात आला आहे.