बेरोजगार युवकाने मागितली माजी महापौरांच्या नावाने खंडणी

कोरोनामध्ये नोकरी गेल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या युवकाने पुण्याचे माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या मोबाईल क्रमांकाचा (स्पूफिंग कॉल) वापर करून त्यांच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाकडे तब्बल ३ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एकजण कोल्हापूर जिल्ह्यातील आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 28 Mar 2023
  • 12:09 pm
बेरोजगार युवकाने मागितली माजी महापौरांच्या नावाने खंडणी

बेरोजगार युवकाने मागितली माजी महापौरांच्या नावाने खंडणी

कोरोनात गमावली नोकरी, डोक्यावर कर्जाचे ओझे; स्पूफिंग करत बांधकाम व्यावसायिकाला दिली धमकी

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

कोरोनामध्ये नोकरी गेल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या युवकाने पुण्याचे माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या मोबाईल क्रमांकाचा (स्पूफिंग कॉल) वापर करून त्यांच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाकडे तब्बल ३ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला असून पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी एकजण कोल्हापूर जिल्ह्यातील आहे.

शेखर गजानन ताकावणे (वय ३५, रा. भालेकर चाळ, कर्वे रोड, पुणे) आणि संदीप पीरगोंडा पाटील (वय ३३, रा. मु. पो. बेकनार, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुरलीधर मोहोळ यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बांधकाम व्यावसायिकाला कॉल केला आणि त्यांच्याकडे ३ कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. संबंधित बांधकाम व्यावसायिक हे मुरलीधर मोहोळ यांचे मित्र असल्याने त्यांनी मोहोळ यांना घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. मोहोळ यांनी याबाबतची माहिती तत्काळ सह-पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिली. त्यानंतर मोहोळ व बांधकाम व्यावसायिकाने शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

तक्रारदारांनी आरोपींना फोनवरून १० लाख रुपये देण्याचे मान्य केले आणि ते घेण्यासाठी कार्यालयात बोलावले. खंडणी मागणार्‍याने स्वतः न येता त्याच्या ओळखीच्या शेखर गजानन ताकावणे याला बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात पाठविले. १० लाख रुपये घेण्यासाठी आल्यानंतर ताकावणेला गुन्हे शाखेच्या युनिट-३ च्या पथकाने ताब्यात घेतले. त्यावेळी त्याच्याकडे सखोल चौकशी करण्यात आली. ताकावणेने खंडणी मागणाऱ्या संदीप पाटीलला

स्वारगेट चौकात बोलवले. मात्र, तो सतत त्याचे ठिकाण बदलत होता. ताकावणेला त्याने कात्रजच्या जुन्या बोगद्याजवळ बोलावले. त्यानंतर पोलिसांना मुख्य आरोपी संदीप पाटीलचे ठिकाण समजल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपींना कोथरूड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पाटील हा मूळचा कोल्हापूर येथील रहिवासी असून, तो सध्या कात्रज-आंबेगाव पट्ट्यात राहतो. तो एका खासगी बँकेत नोकरी करीत होता. कोरोना कालावधीत त्याची नोकरी गेल्याने तो कर्जबाजारी झाला होता. त्यातच त्याला सॉफ्टवेअरची माहिती असल्याने त्याने फेक आयडी कॉलसाठी एक पेड ॲप्लिकेशन डाऊनलोड करून त्याद्वारे मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रताप केला. मात्र, सायबर एक्सपर्ट असणारे गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार यांनी हा प्रकार हेरून युनिट- ३ च्या पथकाला आरोपी पकडण्याची जबाबदारी सोपवत अवघ्या काही तासात दोघांना अटक केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story