पुणेकरांचे बेशिस्त पर्यटन अंगाशी येण्याचा धोका
विजय चव्हाण
नीरा देवघर धरणात कार कोसळल्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना धोकादायक पर्यटनाचा एक नवा प्रकार समोर आला आहे. पाटबंधारे विभागाच्या आवाहनानंतरही खडकवासला धरणालगत पाणी सोडले असतानाही खडकवासला परिसर तसेच खाली मुठा नदीपात्रात पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे आढळून आले आहे.
घाटमाथा आणि पाणलोट क्षेत्रात रविवारी (दि. ३०) जोरदार पाऊस झाला. त्यामुळे, धरणातून पाणी मुठा नदीत सोडले जात आहे. धरणाचे आणि नदीचे किनारे निसरडे झाले आहेत. त्यामुळे, पाण्याच्या बाजूला पर्यटकांनी जाऊ नये, फोटोग्राफी-व्हीडीओ शूटिंग करू नये, सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या सलग सुट्ट्या आहेत. पर्यटकांच्या बाबतीत कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी जाहीर आवाहन पर्यटकांना केले होते. परंतु पर्यटकांनी त्याला वाटाण्याच्या अक्षता दाखवत नदीच्या पात्रात जाणे सुरूच ठेवले आहे.
पाटबंधारे विभागाकडून वारंवार सायरन वाजवून नागरिकांना नदीपात्राच्या बाहेर येण्याच्या सूचना करण्यात येत आहेत, परंतु पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. पुरेसा पोलीस बंदोबस्त नसल्याने पर्यटक शिरजोर झाले आहेत. उत्तमनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण बालवडकर म्हणाले, ‘‘सध्या आमच्याकडील गाड्या बंदोबस्तासाठी गेल्या आहेत. पर्यटक नदीपत्रात उतरल्याची माहिती मिळाल्यावर तातडीने मार्शल आणि दोन पोलीस तिकडे पाठविले. पाण्यात उतरलेल्या पर्यटकांना बाहेर काढून त्यांचे प्रबोधन करण्यात येईल.’’ ‘‘धरणालगतच्या पाटबंधारे विभागाची संरक्षण जाळी तुटलेली आहे. तेथे दोन गार्ड ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत,’’ असे खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे यांनी सांगितले. दरम्यान, नदीपात्रात कोणीही उतरू नये. नदीपात्रात तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास त्यांना तत्काळ हलविण्यात यावे. नदीलगत राहणाऱ्या संबंधित नागरिकांना सूचना द्याव्यात. याबाबत सर्वांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन खडकवासला पाटबंधारे विभागाने केले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.