टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने पावणे सात लाखाला लुबाडले
#पुणे
सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या कल्पना राबवत नागरिकांना गंडा घालत असतात. अशातच आणखी एक वेगळा प्रकार समोर आला असून टास्कच्या बहाण्याने एका व्यक्तीला पावणे सात लाखाला लुबाडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ३० जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत हिंजवडी येथे घडली.
या प्रकरणी ३६ वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार www.5ocyatm.top या संकेतस्थळावरील अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार,आरोपींनी फिर्यादीबरोबर टेलिग्रामवर संपर्क करून टास्क पूर्ण केल्यास फायदा होईल, असे आमिष दाखवले. त्यानुसार आरोपीने फिर्यादीकडून सहा लाख ७५ हजार रुपये घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
पूर्ववैमनस्यातून तलवारीने वार
मोशी येथे चार ते सहाजण पूर्ववैमनस्यातून एकाला मारण्यासाठी आले असता मध्यस्थी करणाऱ्यांवर तलवार आणि कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना मंगळवार रात्री मोशी प्राधिकरण येथे घडली. या प्रकरणी शकील जलील शेख (वय २७, रा. भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी कृष्णा लहू वाघमारे, कुणाल विश्वास वायदंडे, गणेश गुलचंद काळोखे, साहिल दिनेश मोरे व त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी व त्यांचा मित्र सचिन येरे, रिहान शेख हे गप्पा मारत बसले होते. यावेळी दुचाकीवरून आरोपी आले. त्यांच्या हातात कोयते व तलवार होती. जुन्या भांडणाच्या रागातून येरेवर वार करणार होते. यावेळी फिर्यादी भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले असता आरोपींनी तलवारीने डोक्यात, कोयत्याने पायावर वार केले. यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. रिहान शेख याच्याही पाठीवर व हातावर कोयत्याने वार केल्याने तोही जखमी झाला. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.