काका विरुद्ध पुतण्या 2.0; साहेबांची नवी खेळी
विजय चव्हाण
राजकीय कारकिर्दीच्या प्रारंभापासूनच शरद पवार यांच्या ‘जवळचे’ समजले जाणारे, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आगामी काळातील राज्यातील नवा चेहरा असण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे केंद्रात असतील तर राज्याच्या राजकारणात आता रोहित पवार हे त्यांचे काका अजित पवारांना टक्कर देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार आणि रोहित पवार हे नात्याने काका-पुतणे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर युवा नेतृत्वाला संधी देण्याच्या शरद पवार यांच्या घोषणेमुळे आणि नाट्यमय घडामोडींनंतर रोहित यांची शरद पवार यांना मिळत असलेली साथ लक्षात घेता रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे युवा नेतृत्व म्हणून नियोजनपूर्वक पुढे आणण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवे नेतृत्व तयार केले जाईल, अशी घोषणा शरद पवार यांनी अजित पवार यांच्या शपथविधीनंतर प्रतिक्रिया देताना आणि कराड येथे पत्रकार परिषदेत जाहीर केली होती. त्यामुळे पवार यांच्या या घोषणेनंतर रोहित पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय शरद पवार यांनी मे महिन्यात जाहीर केला. त्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. ही घोषणा करताना काही मोजक्या नेत्यांबरोबर रोहित पवार उपस्थित होते. अजित पवार यांनी बंड केल्याचे पुढे आल्यानंतर रोहित पवार तातडीने पुण्यातील शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेवेळी शरद पवार यांनी रोहित यांना जवळ बसण्याची सूचना केली होती. शरद पवार कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जात असतानाही रोहित पवार त्यांच्या समवेत सावलीसारखे होते.
पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सीविक मिररला सांगितले की, "अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकारणात सक्रिय झाले नाहीत. त्याउलट रोहित पवार सक्रिय राजकारणात आले. २०१७ च्या पुणे जिल्हा परिषद निवडणुकीपासून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गणातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि ते विक्रमी मताधिक्याने निवडून आले. सध्या ते कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत. शरद पवार यांच्यामुळेच राजकारणात आल्याचे रोहित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आगामी काळातील युवा नेतृत्व असेल," असे ते म्हणाले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.