कोंढव्यातील अनधिकृत शाळा अखेर बंद
यशपाल सोनकांबळे
तकवा इस्लामिक मकतब अँड स्कूल (टीआयएमएस ) ही कोंढव्यातील अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारींची दखल घेत शिक्षण विभागाने ही कारवाई केली आहे.
पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे साहाय्यक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ११ जुलै २०२३ रोजी तकवा इस्लामिक मकतब अँड स्कूल (टीआयएमएस ) ही कोंढव्यातील अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. शाळेसाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाची आणि जिल्हा परिषदेची संमती घेण्यात आली नसल्याचा उल्लेख या आदेशात करण्यात आला आहे. २००९ च्या शिक्षण हक्क कायद्यातील सेक्शन १८(५) अनुसार बेकायदेशीररीत्या शाळा चालवणे गुन्हा असून त्यासाठी १० लाख रुपये दंडाची तरतूद आहे. हा दंड भरल्यानंतरही संबंधित शाळेला दिवसाकाठी १० हजारांचा अतिरिक्त दंड भरावा लागतो. अशाप्रकारे अनधिकृत शाळा चालवल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची फसवणूक होते.
शाळा बेकायदेशीर असल्याची तक्रार शाळेच्या माजी मुख्याध्यापिका नाझिया खान यांनी शिक्षण विभागाकडे केली होती. ही शाळा स्थापनेपासूनच बेकायदेशीर असून शिक्षण विभागाच्या अनिवार्य कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाही. तसेच या शाळेने शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन केलेले आहे. ही शाळा तत्काळ बंद करण्यात यावी आणि शाळेतील ४०० विद्यार्थ्यांना इतर शाळेत सामावून घ्यावे, अशी मागणीही खान यांनी केलेली आहे.
कोंढव्यातील 'तकवा इस्लामिक मकतब अँड स्कूल' (टीआयएमएस ) ही शाळा अनधिकृत असल्याचे आम्ही ऐकले. चारशेपेक्षा अधिक विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. माजी मुख्याध्यापिका नाझिया खान यांनी, आम्हा पालकांना आमच्या मुलांना इतर शाळेत प्रवेश घेण्याची सूचना केली आहे. शाळा बेकायदेशीर असल्याचे वृत्त आमच्यासाठी धक्कादायक आहे. शाळा बेकायदेशीर असेल तर आमच्या पाल्यांच्या भवितव्याचे काय, त्यांनी कुठे प्रवेश घ्यायचा, तकवा इस्लामिक मकतबच्या संचालकांनी यावर खुलासा करायला हवा, अशी प्रतिक्रिया पालक प्रतिनिधी सलीम खान यांनी 'सीविक मिरर' शी बोलताना व्यक्त केली आहे.
दरम्यान, आम्ही २०२१ साली मान्यतेसाठी शिक्षण विभागाकडे प्रस्ताव दाखल केला होता. मात्र शिक्षण विभागाने कसलाच प्रतिसाद दिलेला नाही. आम्हाला मंत्रालयातून शाळा चालवण्याबाबत संमती मिळाली असल्याची माहिती तकवा इस्लामिक मकतब अँड स्कूलचे संचालक उस्मान अत्तार यांनी दिली आहे. १९ डिसेंबर २०२२ रोजी शाळेबाबत मी पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. शासनाची कसलीच मान्यता नसताना ही शाळा चालवली असल्याची तक्रार मी केली होती. शाळेत अर्हतापात्र शिक्षकही नाहीत, बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे, याबाबत तक्रार केल्यामुळे व्यवस्थापनाने मला पदावरून दूर केले. त्यामुळे मी शिक्षण विभागाकडे याबाबतचा पाठपुरावा केल्याचे नाझिया खान यांनी सांगितले.