गांजाचा साठा करणाऱ्या दोन जणांना अटक
#भोसरी
पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरात गांजाचा साठा करणाऱ्या व्यक्तीला अमली पदार्थविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून ३१ किलो गांजा जप्त करण्यात आला असून, दुसऱ्या एका कारवाईत १० किलो गांजा ताब्यात घेण्यात आला आहे. दोन्ही कारवाईमध्ये १० लाख ६४ हजार रुपयांचा ४१ किलो गांजा विरोधी पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी संजय मोहन शिंदे आणि रवींद्र काशीराम राठोड यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी गावठाण या ठिकाणी आरोपी संजय मोहन शिंदे हा गेल्या काही महिन्यांपासून राहात असून त्याने ३१ किलो गांजाचा साठा जमा केला होता, अशी माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. पथकाने त्या ठिकाणी छापा मारून त्याच्याकडून ३१ किलो गांजा जप्त केला आहे. संबंधित गांजा हा सूरज जंजाळ (रा. चाकण) याच्याकडून आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले असून, त्याच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या एका कारवाईमध्ये रवींद्र काशीराम राठोड हा तालुका खेड वासुली फाटा या ठिकाणी गांजा विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याने हा गांजा विकास बादले या नावाच्या व्यक्तीकडून आणल्याचे समोर आले आहे. म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश पवार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, राजन महाडिक यांच्या टीमने केली आहे.
feedback@civicmirror.in