Two brothers : आई-वडिलांच्या भांडणाला कंटाळून घर सोडणारे दोन भाऊ सापडले सुखरुप

आई-वडिलांच्या रोजच्या भांडणाला कंटाळून दोन चिमुरड्यांनी घर सोडून थेट पुणे रेल्वे स्टेशन गाठले. मात्र, तेथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आल्याने आता हे भाऊ बाल कल्याण समितीने नेमलेल्या संस्थेत दाखल झाले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Rohit Athavale
  • Tue, 9 May 2023
  • 07:22 am
आई-वडिलांच्या भांडणाला कंटाळून घर सोडणारे दोन भाऊ सापडले सुखरुप

आई-वडिलांच्या भांडणाला कंटाळून घर सोडणारे दोन भाऊ सापडले सुखरुप

आई-वडिलांच्या भांडणाला कंटाळून सहा आणि आठ वर्षांच्या चिमुरड्यांनी सोडले होते घर

रोहित आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

आई-वडिलांच्या रोजच्या भांडणाला कंटाळून दोन चिमुरड्यांनी घर सोडून थेट पुणे रेल्वे स्टेशन गाठले. मात्र, तेथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आल्याने आता हे भाऊ बाल कल्याण समितीने नेमलेल्या संस्थेत दाखल झाले आहेत.

निखिल वर्मा (वय ८) आणि नितीन वर्मा (वय ६) अशी या दोघा मुलांची नावे आहेत. देहूगावातील विठ्ठलवाडी येथील राहत्या घरातून शनिवारी (दि. ६) दोघे निघून गेले होते. मात्र, ते देहूगावपासून पुणे रेल्वे स्टेशनपर्यंत कसे आले हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी लक्ष्मी राजकुमार वर्मा (वय ३०) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मी या मध्य प्रदेश तर राजकुमार हे उत्तर प्रदेशचे मूळचे रहिवासी आहेत. दोघांचा प्रेमविवाह असून, गेल्या १० वर्षांपासून ते देहूगाव परिसरात विठ्ठलवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहतात. दोघेही मजुरीचे काम करतात. लक्ष्मी या शनिवारी नेहमीप्रमाणे मुलांना घरी सोडून सकाळी ९ वाजता कामावर गेल्या होत्या. मात्र, सायंकाळी सहा वाजता कामावरून घरी आल्यानंतर दोन्ही मुले घरी नव्हती. त्यानंतर त्यांनी शेजारी आणि नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र दोन्ही मुले कुठेच सापडली नाहीत. यामुळे अखेर लक्ष्मी यांनी पोलिसांत धाव घेतली होती.

दोन्ही मुले देहूगावातील मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना माथी गंध लावण्याचे काम करीत असत. त्यामुळे परिसरातील स्थानिकांना या दोन्ही मुलांबाबत माहिती होती. राजकुमार यांना दारूचे व्यसन असल्याने या दाम्पत्यामध्ये रोज भांडणे होत होती. लक्ष्मी या विकलांगदेखील आहेत. त्यामुळे रोजच्या भांडणाला कंटाळून त्या शुक्रवारी घरातून निघून गेल्या होत्या, पण मुलांसाठी त्या परत घरी आल्या होत्या.

सकाळी आई-वडील घरातून निघून गेल्यावर दोन्ही मुले कोणाला काही न सांगता गावातून बाहेर पडली. त्यानंतर संध्याकाळी लक्ष्मी घरी आल्यावर मुले घरात नसल्याचे उघड झाले होते. तोपर्यंत मुले पुणे रेल्वे स्टेशनवर पोहचली होती. महिला आणि बाल कल्याण समितीचे कार्यकर्ते शहर परिसरात फिरत असतात. त्यांना ही दोन्ही मुले एकटीच स्टेशन परिसरात वावरत असल्याचे लक्षात आले. त्यांनी रेल्वे पोलिसांना याची कल्पना देऊन दोन्ही मुलांना बाल कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांकडे नेले होते.

दुसरीकडे देहूरोड पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी परिसरात मुलांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. गेल्या काही महिन्यात पिंपरी-चिंचवडमधून लहान मुलांच्या अपहरणाच्या अनेक घटना घडल्या आहेत. हे पाहता सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देहूरोड पोलीस ठाणे गाठले होते. उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त पद्माकर घनवट, वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी तीन पथके तयार करून दोन्ही मुलांचा शोध सुरू केला. शहरातील देहूरोड, निगडी, चिंचवड आणि पिंपरी तसेच मावळातील रेल्वे स्टेशन परिसरात शोध सुरू केला. मागील घटनांचा अनुभव पाहता शहरातील काही मंदिर परिसरात आणि मावळातील गावागावांमध्ये जाऊन मुलांचे फोटो दाखविण्याचे काम पोलीस करीत होते.

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात शोधायला गेलेल्या पथकाला या दोन्ही मुलांना बाल कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांकडे नेण्यात आल्याचे रविवारी उशिरा समजले. त्यावरून पोलिसांनी बाल कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन चौकशी केली असता, मोठा मुलगा निखिल हा तापाने फणफणला असल्याचे समजले. यामुळे त्याच्याकडे अधिक चौकशी करता आली नाही. परंतु, या दोन्ही मुलांनी घरातील रोजच्या भांडणाला कंटाळून गाव सोडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे यांनी दिली.

या मुलांचे समुपदेशन बाल कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. त्यानंतर देहूगावातून पुण्यात कसे गेले, याची चौकशी पोलीस मुलांकडे करणार आहेत. वर्मा दाम्पत्याला बोलावून पोलिसांनी समज दिली आहे. देहूरोड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story