पोलिसांची घरे फोडणाऱ्या दोघा सख्ख्या भावांना अटक
सीविक मिरर ब्यूरो
पोलिसांच्या घरांमधून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या दोघा सख्ख्या भावांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी महाराष्ट्रासह गुजरातमध्ये मिळून तब्बल ७० गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
लखनसिंग क्रिपालसिंग सरदार (वय २८) आणि सतपालसिंग क्रिपालसिंग सरदार (वय २६ रा. घासकौर दरवाजा, गुजरात) अशी अटक करण्यात आलेल्या भावांची नावे आहेत.
काही दिवसांपूर्वी वाकड पोलीस वसाहतीतील घरांमधून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केला होता. त्यासह शहरातील विविध भागात अचानक घरफोडीचे गुन्हे वाढू लागले होते. त्यामुळे बाहेरील टोळी शहरात आल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला होता.
दरम्यान, निगडी भागातून चोरीला गेलेल्या दुचाकीचा वापर करून वाकड भागात घरफोडी झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी या दुचाकीवर लक्ष केंद्रित केले. ही दुचाकी रावेत भागात असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना समजली. त्यांनी वाकड पोलीस ठाण्यातील कर्मचारी भास्कर भारती, स्वप्नील लोखंडे, प्रमोद कदम यांना दोन्ही आरोपी हे रावेत परिसरात असून त्यांच्यावर काही दिवस विशेष लक्ष
ठेवण्यास सांगितले.
आरोपी दुचाकी घेऊन पुन्हा पिंपळे सौदागर परिसरात चोरी करण्यासाठी निघाले. तेव्हा पोलिसांनी सरदार बंधूंना चोरी करताना रंगेहाथ पकडले. त्यांच्याजवळील आणि रावेत येथील तात्पुरत्या घरातून २४ लाख ६८ हजारांचे ६० तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत
केले आहेत.
सरदार बंधूंकडून शहरातील १६, राज्यातील १९ असे एकूण ३५ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याचबरोबर गुजरात राज्यात या दोघांसह टोळीवर ७० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील काही सदस्यांना यापूर्वी गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. सरदार बंधू नांदेड येथे पळून आले आहेत. नांदेड येथील एका प्रार्थनास्थळात राहिल्यानंतर दोघे रावेत येथे राहण्यास आले. रावेत येथे एक खोली भाडेतत्त्वावर घेऊन सरदार बंधू दररोज शहरातील बंद घरे हेरत होते.
वाकड येथील पोलीस वसाहत मोठी असल्याने आणि तेथील अनेक घरे बंद असल्याने सरदार बंधूंनी या ठिकाणी चोरी करायचे नियोजन केले. मात्र, या दोघांना हे खासगी गृहसंकुल नसून पोलिसांची वसाहत असल्याचे माहीत नव्हते. मात्र, पोलिसांच्या घरातच चोरी झाल्याने सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली होती. वाकड पोलीस वसाहत ते रावेत या भागातून चोरट्यांनी प्रवास केल्याचे समजल्याने पोलिसांनी या भागावर लक्ष केंद्रित करून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केल्याची माहिती उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.