पुणे मेट्रोची 'ट्रायल विथ एरर'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला खरा पण त्यानंतर मेट्रो त्यापुढे एक इंचही धावलेली नाही. अजूनही विविध मार्गांवर केवळ ट्रायल रन सुरू असून प्रत्यक्षात नव्या मार्गांवर ही मेट्रो कधी धावणार, असा सवाल केला जात आहे. चार महिन्यांपूर्वी गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर न्यायालय मार्गावर तर सोमवारी (२७ मार्च) न्यायालय ते रुबी हॉल स्थानकांदरम्यान चाचणी घेण्यात आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Tue, 28 Mar 2023
  • 12:05 pm
पुणे मेट्रोची 'ट्रायल विथ एरर'

पुणे मेट्रोची 'ट्रायल विथ एरर'

स्थानकांची कामे अपूर्ण तरीही ट्रायलचा गाजावाजा; अधिकाऱ्यांनाही सांगता येईना नक्की तारीख

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी पुणे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला खरा पण त्यानंतर मेट्रो त्यापुढे एक इंचही धावलेली नाही. अजूनही विविध मार्गांवर केवळ ट्रायल रन सुरू असून प्रत्यक्षात नव्या मार्गांवर ही मेट्रो कधी धावणार, असा सवाल केला जात आहे. चार महिन्यांपूर्वी गरवारे महाविद्यालय ते शिवाजीनगर न्यायालय मार्गावर तर सोमवारी (२७ मार्च) न्यायालय ते रुबी हॉल स्थानकांदरम्यान चाचणी घेण्यात आली. पण प्रत्यक्षात प्रवाशांसाठी मेट्रो कधी सुरू होणार, हे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनाही सांगता येत नाही. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी मार्चची डेडलाईन दिली होती. आता पुन्हा एक महिन्यांनी मुहूर्त पुढे ढकलण्यात आला आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मेट्रोमुळे काही प्रमाणात ही कोंडी फुटेल, असा दावा महामेट्रोसह पालिका प्रशासन तसेच सत्ताधारी करत आहेत. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गांवर सध्या काम सुरू आहे. तर पंतप्रधानांनी ६ मार्च २०२२ रोजी पुण्यात येऊन मेट्रोला सुरुवात केली. तत्कालीन सत्ताधारी भाजपकडून त्याचा मोठा गाजावाजाही करण्यात आला. प्रत्यक्षात या मार्गावर गरवारेपर्यंत अजूनही स्थानकांवर काही कामे सुरूच आहेत. गरवारे ते न्यायालयापर्यंतच्या सर्व स्थानकांची कामे अर्धवट आहेत. चार महिन्यांपूर्वी केवळ चाचणी झाली. त्यावेळी स्थानकांची कामे नुकतीच सुरू झाली होती. अजूनही बरेच काम बाकी असल्याचे सध्याचे चित्र आहे. गरवारे महाविद्यालयानंतर डेक्कन जिमखाना, संभाजी उद्यान आणि पुणे महापालिका ही स्थानके आहेत. डेक्कन ते नारायण पेठ आणि संभाजी उद्यान ते शनिवार पेठ या दरम्यान नदीवर पादचारी पूल उभारणीचे काम अजून ५० टक्केही पूर्ण झालेले नाही.

फुगेवाडी ते न्यायालय या मार्गावर डिसेंबर महिन्यात चाचणी झाली होती. त्यालाही तीन महिने उलटले आहेत. या मार्गावरील कामे अजून सुरूच आहेत. शिवाजीनगर न्यायालय इंटरचेंज स्थानकाचे कामही बरेचसे बाकी आहे. तर न्यायालय ते रुबी हॉल मार्गावर आरटीओ, पुणे स्टेशन व रुबी अशी तीन स्थानके आहेत. तिथेही छोटी-मोठी कामे सुरूच आहेत. असे असतानाही मेट्रो अधिकाऱ्यांकडून केवळ चाचणी घेत त्याचा गाजावाजा करून पुणेकरांना आशेचा किरण दाखवला जात आहे. सोमवारी झालेल्या चाचणीनंतर माध्यमांशी बोलताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी गरवारे ते रुबी हॉल आणि फुगेवाडी ते न्यायालय या दोन्ही मार्गांवरील कामे एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होतील, असा दावा केला आहे. त्यानंतर ही सेवा प्रवाशांसाठी खुली होईल, असेही ते म्हणाले.

दीक्षित म्हणाले, मेट्रोचे काम करताना अधिकारी, कामगारांना विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी कामात अनेक अडचणी आहेत. पण त्यावर मात करून काम वेगाने सुरू आहे. एप्रिल अखेरपर्यंत दोन्ही मार्गांवरील काम पूर्ण होईल. सध्या बरीचशी कामे पूर्ण झाली आहेत. कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरसी) यांच्याकडूनही निरीक्षण सुरू आहे. त्यांच्या मान्यतेनंतर प्रवाशांसाठी सेवा खुली करता येईल. या मान्यतेनंतर राज्य व केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आम्ही या मार्गांवर सेवा सुरू करू, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिवाजीनगर ते स्वारगेट आणि रुबी हॉल ते रामवाडी हे मार्ग पुढील टप्प्यात सुरू केले जाणार आहेत. त्यातील अनेक महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण आहेत. बंडगार्डन परिसरातील नदीवरील पूल, स्वारगेट स्थानक, मंडई, तसेच इतर स्थानकांची कामे सुरू आहेत. त्यामुळे हे मार्ग सुरू व्हायला बराच कालावधी लागणार आहे. त्यामुळे दोन्ही मार्ग पूर्णत्वास कधी जाणार याबाबत साशंकता आहे. सध्या सुरू असलेल्या मार्गावर अपेक्षित प्रवासी मिळत नाहीत. बहुतेक वेळा मेट्रो रिकामीच धावत आहे. मेट्रो प्रशासनाकडून शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी तसेच अन्य प्रवाशांना विविध  कार्यक्रम घेत आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण कमी अंतराच्या मार्गामुळे प्रतिसाद अत्यल्प आहे. किमान रुबी हॉलपर्यंत मार्ग सुरू झाल्यास शिवाजीनगर व पुणे स्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा होईल. मेट्रोचेही प्रवासी वाढतील, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story