टोईंग कर्मचाऱ्यांची दुकानदारास मारहाण
नितीन गांगर्डे
'नो पार्किंग'मध्ये उभ्या असलेल्या गाड्या उचलण्यास आलेल्या टोईंग कर्मचाऱ्यांनी एका दुकानदाराला कपडे फाटेपर्यंत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रमेश बराई (वय ४२) असे मारहाण झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. हडपसर येथे शनिवारी (२९ एप्रिल) सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रकार घडला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्याचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून टोईंग कर्मचाऱ्यांच्या उर्मट वागण्यावर सडकून टीका होत आहे. अनेकांनी टोईंग कर्मचाऱ्यांच्या उद्धट वागण्याचा अनुभव या व्हीडीओवर प्रतिक्रिया देताना सांगितला आहे.
हडपसरमध्ये मंडईत रमेश बराई यांचे अनिल फूटवेयर नावाचे चपलांचे दुकान आहे. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास रमेश यांच्या दुकानासमोर एक बुलेट उभी होती. त्यातील पेट्रोल गळत असल्याचे दुकानातील कामगारांनी रमेश यांना सांगितले. दुचाकी दुकानासमोरच उभी असल्याने रमेश पाहायला गेले. टाकी फुल झाल्याने त्यातून पेट्रोल गळत होते. रमेश यांनी तिला डबल स्टॅण्डवर उभी केली. तेवढ्यात त्या ठिकाणी 'नो पार्किंग'मध्ये उभी असणारी वाहने उचलून नेणारी वाहतूक पोलिसांची टोईंग व्हॅन आली. टोईंग कर्मचाऱ्याने प्रत्येक वेळेस तू गाडी उचलू देत नाही, असे म्हणत रमेश यांच्याशी अरे-तुरे करत हुज्जत घालून शिवीगाळ केली. मुस्काडीत मारण्याची धमकीही दिली. वयाने लहान असूनही तो शिवीगाळ करत असल्याचा राग येऊन रमेश यांनी पदपथावरील सिमेंटची वीट त्या कर्मचाऱ्यावर उगारली. याचा राग येऊन दुसऱ्या टोईंग कर्मचाऱ्याने थेट रमेश यांना मारहाण करायला सुरुवात केली. या मारहाणीमध्ये त्यांचे कपडे फाटल्याचे रमेश यांनी 'सीविक मिरर'शी बोलताना सांगितले. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे.
रमेश यांना मारहाण होत असताना तेथील महिला वाहतूक कर्मचाऱ्याने बघ्याची भूमिका घेतली असल्याचे सीसीटीव्हीत दिसते आहे. टोईंग व्हॅनमधील मुले कायम उद्धटपणे बोलतात, शिवीगाळ करत असतात, असे रमेश म्हणाले. मारहाणीचा प्रकार घडला त्याच्या अगोदरच्या दिवशीच टोईंग कर्मचाऱ्यांनी रमेश यांच्या शेजारच्या दुकानदाराला शिवीगाळ केल्याचे त्या दुकानदाराचे म्हणणे आहे. रमेश यांना मारहाण झाल्यावर तू गुन्हा दाखल करू नको. जर गुन्हा दाखल केला तर तुझ्यावरच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी महिला वाहतूक कर्मचाऱ्याने दिली. म्हणून मी याची पोलिसांत तक्रार दिली नसल्याचे रमेश म्हणाले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.