पुन्हा टोलधाड

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर येत्या १ एप्रिलपासून टोलदरात तब्बल १८ टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा झटका बसला आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर सप्टेंबर २०१९ मध्ये करण्यात आलेली टोलवसुली आणि जानेवारी २०२३ या महिन्यातील वसुलीमध्ये तब्बल ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असूनही पुन्हा टोलदर वाढवल्याने सर्व स्तरांतून या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Wed, 29 Mar 2023
  • 12:14 pm
पुन्हा टोलधाड

पुन्हा टोलधाड

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर २०१९ पासून वसुलीत ७० टक्के वाढ, तरीही १ एप्रिलपासून टोलदरात १८ टक्क्यांची भर

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@rajanandmirror

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर येत्या १ एप्रिलपासून टोलदरात तब्बल १८ टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठा झटका बसला आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर सप्टेंबर २०१९ मध्ये करण्यात आलेली टोलवसुली आणि जानेवारी २०२३ या महिन्यातील वसुलीमध्ये तब्बल ७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. असे असूनही पुन्हा टोलदर वाढवल्याने सर्व स्तरांतून या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गामध्ये पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग अव्वल स्थानी आहे. या मार्गावर तळेगाव, शेडुंग, कुसगाव आणि खालापूर असे चार टोलनाके आहेत. चारही टोलनाक्यांवर मिळून जानेवारी २०२३ या महिन्यात तब्बल ४० लाख वाहनांनी ये-जा केली आहे. सध्याच्या टोलदरानुसार, या वाहनांकडून सुमारे १०३ कोटी रुपयांची टोलवसुली करण्यात आली. वर्षागणिक हा आकडा वाढतच आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये एकूण टोलवसुली ६० कोटी रुपये एवढीच होती. त्यामध्ये साडे तीन वर्षांत ४३ कोटींनी वाढ झाली आहे. त्यानंतरही टोल कंपनीला टोलदरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांच्या खिशावर डल्ला मारण्याचा हा प्रकार असल्याची टीका या निर्णयावर केली जात आहे.

नवे दर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. कारचालकांना सध्या २७० रुपये मोजावे लागत असून आता ३२० रुपये टोल द्यावा लागेल. बससाठी ९४० रुपये, टेम्पोसाठी ४९५, तर ट्रकसाठी ६८५ रुपये द्यावे लागणार आहेत. थ्री अॅक्सेलचे दर जवळपास ३०० रुपयांनी वाढून १६३० झाले आहेत, तर मल्टी अॅक्सेल वाहनांना १ एप्रिलपासून २ हजार १६५ रुपये टोल पडणार आहे. या दरवाढीला आता विरोध होऊ लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माल आणि प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी या दरवाढीचा पुनर्विचार करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ‘‘या निर्णयाचा देशातील तसेच राज्यातील माल आणि प्रवासी वाहतूक करणारी व्यावसायिक वाहने याबरोबरच खासगी वाहनधारकांना आर्थिक फटका बसणार आहे. तीन वर्षांची दरवाढ एकाचवेळी करणे चुकीचे आहे. कोविडनंतर आता देशातील माल आणि प्रवासी वाहतूकदार, खासगी वाहन चालक सावरत आहेत. त्यात ही वाढ परवडणारी नाही. मार्गावर ९४ किलोमीटरसाठी ही वाढ अन्यायकारक आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा, ’’ अशी मागणी बाबा शिंदे यांनी केली आहे.

सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनीही या दरवाढीवर टीका केली. ते म्हणाले, ‘‘या मार्गावर सप्टेंबर २०१९ मध्ये एकूण टोल ६० कोटी रुपये जमा झाला होता. जानेवारी २०२३ मध्ये या रस्त्यावर १०३ कोटी रुपये टोल जमा झाला, असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर दिसते. म्हणजेच सव्वातीन वर्षात मासिक टोलवसुलीत ७० टक्के वाढ झाली. तरीही १ एप्रिलपासून टोलदरात १८ टक्केने दरवाढ करण्यात येणार आहे. ही दरवाढ किती अनावश्यक आणि नागरिकांच्या खिशावर डल्ला मारणारी आहे, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे.’’

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story