प्रियकराच्या त्रासाला कंटाळून युवतीने संपवले जीवन
#वानवडी
प्रियकराच्या त्रासामुळे एका १९ वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी प्रियकरासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियकर प्रवीण पिडालथा (रा. आंध्र प्रदेश) आणि त्याची चुलत बहीण नॅन्सी पिडालथा (रा. घोरपडी) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत युवतीच्या आईने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
युवतीने घोरपडी परिसरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली होती. युवतीच्या आईने न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशाने प्रियकर प्रवीण आणि चुलत बहीण नॅन्सी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी प्रवीण आणि आत्महत्या केलेल्या १९ वर्षीय युवतीचे प्रेमसंबंध होते. प्रवीण आणि नॅन्सीने तिच्याकडे पैशांची मागणी केली होती. युवतीने खर्चासाठी पैसे हवेत, असे सांगून आईकडून पैसे घेतले होते. तिने आईकडून घेतलेले पैसे दोघांना दिले होते. त्यानंतर आरोपींकडून युवतीला पैशांसाठी धमकावण्यात येत होते. समाजमाध्यमावर युवतीची छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली. आरोपींच्या त्रासामुळे युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक खरबडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.