वेळीच उपचार; १० वारकऱ्यांचे वाचले प्राण
विजय चव्हाण
यंदाच्या वर्षी प्रथमच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्यासह विविध पालख्यांच्या मुक्कामी अतिदक्षता विभागाची सुविधा सरकारच्या आरोग्यवारी उपक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर, प्रशिक्षित परिचारिका, अद्ययावत वैद्यकीय उपकरणे आणि औषधेही उपलब्ध करण्यात आली होती. त्यामुळे वेगवेगळ्या कारणांनी अत्यवस्थ झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करता आले.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार म्हणाले, ‘संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर आणि पंढरपूर येथे रुग्णांना दाखल करून उपचारासाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे वारीच्या वाटेवर असताना सुमारे तीन हजार रुग्णांवर उपचार करता आले. त्यात दहा हृदयविकार झालेल्या रुग्णांचा समावेश होता. त्यांना त्रास होऊ लागताच पहिल्या तासाभरात अचूक निदान करून त्यांच्यावर प्रभावी उपचार करण्यात यश आले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचवणे शक्य झाले. तसेच, पंढरपूरमध्ये गोपाळपूर, तीन रस्ता आणि वाखरी येथे रुग्णांच्या उपचाराची सुविधा उभारली होती. तेथे सुमारे ९५० रुग्णांना दाखल करून उपचार करण्यात आले.’
'पंढरपूरमध्ये कान, नाक, घसा (ईएनटी), नेत्रतज्ज्ञ, स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ, दंतरोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, हृदयरोगासह शस्त्रक्रियेपर्यंतच्या सर्व विशेष सेवा उपलब्ध केल्या होत्या. तसेच, बाइक अँब्ल्युलन्स, १०८ - आपत्कालीन वैद्यकीय सेवा सज्ज ठेवण्यात आली होती. त्यामुळे वारीच्या वाटेवर असलेल्या प्रत्येक वारकऱ्याला अत्यावश्यक आरोग्य सेवा मिळतील, याची काटेकोर काळजी घेण्यात आली होती', असेही त्यांनी सांगितले.
पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी सरकारतर्फे विमा संरक्षण देणारी विठ्ठल-रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. लाखो वारकऱ्यांना यामुळे सरकारच्या खर्चाने विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या ३० दिवसांसाठी हे विमासंरक्षण असेल.
आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी पंढरपुरात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, व देशाच्या इतर भागातून लाखो वारकरी येत असतात. बहुसंख्य वारकरी पायी चालत पंढरपूरला येत असतात, तसेच वारकऱ्यांमध्ये वृद्ध स्त्री व पुरुष भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे वारकऱ्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यास त्यांना तत्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत यांच्या संकल्पनेतून 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.