केबल काढायलाही ‘जी-२०’चा मुहूर्त

खड्डे विरहित रस्ते, सुशोभित पदपथ आणि रस्ता दुभाजक, भुयारी मार्ग आणि पदपथावर पुरेसा प्रकाश देणारे दिवे, वायरच्या जंजाळातून रस्ते मुक्त करणे हे कोणत्याही सुव्यवस्थित वाहतूक व्यवस्था असलेल्या शहरातील दृश्य असते. मात्र, ही साधी कामे करून घेण्यासाठीही पुण्यात जी-२० सारख्या परिषदांची वाट पाहिली जात आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Sun, 12 Mar 2023
  • 10:23 am
केबल काढायलाही ‘जी-२०’चा मुहूर्त

केबल काढायलाही ‘जी-२०’चा मुहूर्त

पुन्हा पालटणार शहराचा तोंडवळा; जूनमध्ये होणाऱ्या बैठकांसाठी रस्ते, दुभाजक, पदपथ प्रकाशणार

विशाल शिर्के

vishal.shirke@civicmirror.in

TWEET@vishal_mirror

खड्डे विरहित रस्ते, सुशोभित पदपथ आणि रस्ता दुभाजक, भुयारी मार्ग आणि पदपथावर पुरेसा प्रकाश देणारे दिवे, वायरच्या जंजाळातून रस्ते मुक्त करणे हे कोणत्याही सुव्यवस्थित वाहतूक व्यवस्था असलेल्या शहरातील दृश्य असते. मात्र, ही साधी कामे करून घेण्यासाठीही पुण्यात जी-२० सारख्या परिषदांची वाट पाहिली जात आहे. विश्रामबाग परिसरातील पेठा वायरच्या जंजाळात अडकल्या आहेत. या वायर भूमिगत करण्यासाठी जूनमध्ये होणाऱ्या जी-२०च्या बैठकीचा मुहूर्त महापालिकेने निवडला आहे. त्याचबरोबर रस्त्यांवरील पोलचे अडथळे दूर करणे, रंगरंगोटी करणे, पथदिव्यांचे खांब बदलणे अशी कामेही या निमित्ताने केली जाणार आहेत.

जी-२० परिषदेची पुढील बैठक जून महिन्यात पुण्यात होणार आहे. आता त्यासाठी पुन्हा शहराला रंगरंगोटी केली जाणार आहे. पाहुणे जाणार असलेले मार्ग पुन्हा सुशोभित होणार आहेत. अनावश्यक पथदिवे काढले जाणार असून, पथदिव्यांना रंगरंगोटीही केली जाणार आहे. तर, काही ठिकाणी नवीन पथदिवे बसवण्यात येणार असून, पावसाळ्यापूर्वी पुणे शहर पुन्हा एकदा सजवले जाणार आहे. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, यूरोपीय  संघ, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जापान, मेक्सिको, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, युनायटेड किंगडम आणि अमेरिका देशातील प्रतिनिधी जी-२० परिषदेत सहभागी झाले आहेत. डिसेंबर-२०२२ पासून देशभरातील प्रमुख शहरात ही परिषद होत आहे. ऊर्जा, शेती, व्यापार, पर्यटन, महिला सबलीकरण, भ्रष्टाचार प्रतिबंध आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अशा विविध विषयांमध्ये परस्पर संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी ही परिषद होत आहे. जानेवारी महिन्यात पुण्यात पहिली फेरी झाली. आता १२ ते २८ जून दरम्यान दोन टप्प्यांत पुण्यात बैठक होणार आहे. नगर रस्ता आणि सेनापती बापट रस्त्यावरील 'हयात' आणि 'मॅरिएट' या पंचतारांकित हॉटेलमध्ये या बैठका होतील. त्यामुळे या परिसरातील आणि पाहुणे भेट देण्याची शक्यता असलेल्या संलग्न रस्त्यांवर पुन्हा रंगरंगोटी केली जाणार आहे. या रस्त्यांवरील पथदिवे, रस्त्यावरून गेलेल्या वायर्स काढल्या जाणार असून, पदपथही सुशोभित केले जातील.  

केबल वायरचा गुंता काढण्याचा मुहूर्त ठरला

कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत शहरातील मध्यवर्ती पेठांचा भाग येतो. या पेठांमध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या वायरचे अक्षरशः जंजाळ पसरले आहे. यामुळे विद्रुपीकरणात भर पडतेच. शिवाय काही कारणाने वायर तुटून पडल्यास ती अनेक दिवस रस्त्यावर पडून राहते. त्यामुळे अपघाताचाही धोका वाढतो. या वायर काढून भूमिगत केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर अडथळा ठरणारे विद्युत खांब इतरत्र हलवण्यात येणार आहेत. शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता आणि टिळक रस्त्यावरील पथदिव्यांची प्रणाली सुधारली जाणार आहे. त्यामुळे हे रस्ते पूर्वीपेक्षा अधिक उजळतील. या कामांसाठी १७ लाख ३४ हजार ६६७ रुपये खर्च केले जाणार आहेत. या सर्व समस्यांचे निराकरण यापूर्वी का करण्यात आले नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

भुयारी मार्गात पडणार प्रकाश...

पुणे विद्यापीठ चौक ते सीआयडी ऑफिस, शनिवारवाड्यासमोरील छत्रपती शिवाजी महाराज पूल, मोरया गोसावी भुयारी मार्ग, संचेती हॉस्पिटल येथील भुयारी मार्ग आणि बंडगार्डन परिसर दिव्यांनी उजळणार आहे. त्यासाठी २२ लाख ४ हजार ९७९ रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. शहरातील अनेक भुयारी मार्गांची अवस्था बिकट आहे. त्यात ससून रुग्णालय, कोथरूड, सातारा रस्ता येथील मार्गांचा समावेश करता येईल. स्थानिक नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र आता जी-२० निमित्त परदेशी पाहुणे येणार असल्याने भुयारी मार्गांत नवे दिवे बसवले जाणार आहेत.

रोषणाईवर होणार एक कोटीचा खर्च

जी-२०साठी पदपथावरील दिवे बसवणे, भुयारी मार्ग उजळवणे, पथदिव्यांना रंगरंगोटी करणे, नवीन पोल बसवणे अशा विविध विद्युत कामांसाठी १ कोटी १२ लाख ५५ हजार ३२२ रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.  

कुंड्या अन् स्वच्छतागृहांना लावली होती झालर...

जानेवारी महिन्यात पुण्यात जी-२०च्या बैठका झाल्या होत्या. त्यावेळी पाहुणे जाणार असलेल्या रस्त्यांवर भल्या मोठ्या झाडांच्या कुंड्या लावल्या होत्या. सार्वजनिक स्वच्छतागृह, खराब अथवा पडीक इमारती, झोपडपट्टीच्या रस्त्याच्या कडेचा भाग अशा ठिकाणी रेशमी कापडाच्या झालर लावण्यात आल्या होत्या. रस्ते चकाचक करण्यात आले होते. यावरून महापालिकेवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. तर, सुशोभीकरणाची कामे सातत्याने व्हावीत यासाठी वर्षातून एकदा अशा परिषदा पुण्यात व्हाव्यात म्हणजे निदान कामे तरी होतील असा चिमटा काढण्यासही पुणेकर विसरले नव्हते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story