चाकण-म्हाळुंगे एमआयडीसीत पिस्तुलाच्या जोरावर तिघांला लुटले, पोलिसांकडून उशिराने गुन्हा दाखल
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
कामावरून घरी परतणाऱ्या कामगारांना पिस्तुलाच्या धाकाने लुटण्याच्या तीन घटना चाकण-म्हाळुंगे एमआयडीसी परिसरात घडल्या. तीन दिवसांच्या फरकाने घडलेल्या या घटनांमधील आरोपींचा शोध लागल्यानंतर गुन्हे दाखल केल्याची चर्चा परिसरात आहे.
पहिल्या दोन घटनांमध्ये अज्ञात असणारे आरोपी तिसऱ्या घटनेत निष्पन्न झाले. ६, ८ आणि ९ मे या दिवसांमध्ये सदर घटना घडल्या. घटना घडल्यानंतर उशिराने हे गुन्हे दाखल झाले आहेत. रंजनकुमार नंदलाल हरिजन (वय २८, सध्या रा. आळंदी फाटा, चाकण, मूळ उत्तर प्रदेश) याने या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात, तर शुभम बळीराम कांगणे (वय २४, सध्या रा. चाकण, मूळ वाशीम) आणि जयराम भौरा मुंडा (वय २८, सध्या रा. कुरुळी चाकण, मूळ झारखंड) या दोघांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी आदेश कड, विशाल वाणी या दोघांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन साथीदारासह दोघांचा शोध सुरू आहे.
रंजनकुमार शनिवारी (दि. ६) रात्री एक वाजता रिलायन्स पेट्रोल पंपाजवळून पायी जात होता. दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने रंजनकुमारच्या डोक्याला पिस्तूल लावून ‘‘तुझ्याकडे जे काही आहे ते काढून दे,’’ असे धमकावले. त्यानंतर रंजनकुमारकडील साडेदहा हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन तिघे दुचाकीवरून पसार झाले.
त्यानंतर दोन दिवसांनी (दि. ८) रात्री साडेअकराच्या सुमारास पुणे-नाशिक हायवेनजीक असलेल्या हॉटेल कारभारीजवळ तिघांनी दुचाकीवरून येऊन जयराम मुंडा याला तंबाखूची मागणी करण्याच्या बहाण्याने अडविले. ‘‘माझ्याकडे तंबाखू नाही,’’ असे मुंडा सांगत असतानाच आरोपींपैकी एकाने थेट त्याच्या डोक्याला पिस्तूल लावले. अन्य दोन आरोपींनी मुंडा याला पकडून त्याचे खिसे तपासायला सुरुवात केली. तेव्हा मुंडा याने आरडा-ओरड केली असता, जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या खिशातून मोबाईल आणि ४० रुपये रोख काढून घेत आरोपींनी दुचाकीवरून पळ काढला.
या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी (दि. ९) अशाच प्रकारे शुभम कांगणे याला लुटण्यात आले. कामावरून घरी पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी शुभमला तळेगाव-चाकण रस्त्यावर सहारा सिटीच्या कोपऱ्यावर ‘‘तंबाखू आहे का,’’ म्हणत थांबविले. नंतर त्याला एका टपरीच्या मागे ओढत नेऊन डोक्याला पिस्तूल लावून ‘‘तुझ्याजवळ ज्या काही वस्तू आहेत त्या काढून दे,’’ असे म्हणून धमकावले. यावेळी ‘‘मी दोन मर्डर केले आहेत. लवकर सगळ्या वस्तू काढून दे नाही तर तुझाही मर्डर करतो,’’ असा दम देत आरोपींनी शुभमचा मोबाईल, रोख पाचशे रुपये, मोबाईल हेडफोन तसेच बॅगेतील कपडे असा अकरा हजार रुपयांचा ऐवज लुटला.
अशा प्रकारे पिस्तुलाच्या धाकाने लूटमारीची ९ तारखेची घटना घडल्यानंतर ६ तारखेला घडलेल्या घटनेची फिर्याद नोंदवून घेण्यात आली. दोन्ही घटना समान असून, जवळपासच घडल्या आहेत. ६ तारखेला चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत लूटमारीची घटना घडूनही त्याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली नव्हती. तक्रारदार ९ तारखेला आल्याने त्या दिवशी गुन्हा दाखल केल्याचे आता सांगितले जात आहे.
त्याचबरोबर ९ तारखेला घटना घडल्यावर पहिल्या घटनेतील फिर्यादी आणि तिसऱ्या घटनेतील आरोपी १० तारखेला पोलीस ठाण्यात अचानक कसे अवतरले, हे मात्र पोलिसांना सांगता आले नाही. तिन्ही घटनांचा तपास चाकण, म्हाळुंगे एमआयडीसी आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींबाबत सुगावा लागल्यावर त्यांना पकडून गुन्हे दाखल केल्याचे बोलले जात असतानाच, अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कल्पना नसल्याचेही सांगितले जात आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.