कर्तव्यात कसूर, तीन हवालदार निलंबित
विजय चव्हाण
पुण्यातील सदाशिव पेठेत दोन दिवसांपूर्वी एका तरुणीवर एकतर्फी प्रेमप्रकरणातून कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरुगेट पोलीस चौकीमध्ये तीन कर्मचारी उपस्थित नव्हते. त्यामुळे कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी या पोलीस हवालदारांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी दिले आहेत.
पोलीस हवालदार सुनील शांताराम ताठे, पोलीस कर्मचारी प्रशांत प्रकाश जगदाळे आणि सागर नामदेव राणे अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सदाशिव पेठेत दोन दिवसांपूर्वी सकाळी १० च्या सुमारास आरोपी शंतनू जाधवने एका तरुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत तरुणी जखमी झाली,
हल्लेखोरास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, पण घटनास्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेरुगेट चौकीत त्यावेळी पोलीस नव्हते. या घटनेनंतर तब्बल २० मिनिटांनी पोलीस कर्मचारी चौकीत आणि घटनास्थळी दाखल झाले. ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येताच पुण्यातील नागरिकांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त संताप व्यक्त केला होता, विरोधी पक्षांनीही टीकेची झोड उठवली होती.
गृहमंत्र्यांचा फोन आणि कौतुकाची थाप
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यात तरुणीला कोयत्याने झालेल्या हल्ल्यातून वाचवणाऱ्या तरुणांशी फोनवरून संवाद साधला. यावेळी फडणवीसांनी लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोघांचंही व्यक्तिगतरित्या कौतुक केले. भाजपचे माजी आमदार व पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या फोनवरून हा संवाद झाला. यावेळी फडणवीसांशी बोलताना लेशपाल जवळगेनेही आपली भावना व्यक्त केली. लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल फडणवीसांनी त्यांचे कौतुक केले. फडणवीस आधी हर्षद पाटीलशी बोलले आणि कौतुक केले. त्यावर हर्षदने आभार मानले. तसेच फोन लेशपाल जवळगेकडे दिला. त्यानंतर फडणवीस लेशपाल जवळगेशी बोलले. यावेळी देवेंद्र फडणवीसांशी फोनवर बोलताना लेशपालने फडणवीसांचा फोन आल्याने फार छान वाटत असल्याची भावना व्यक्त केली. फडणवीसांनी तरुणीला वाचवल्याबद्दल फोनवर कौतुक केल्यावर, धन्यवाद, तुमचा फोन आला आणि तुम्ही आमच्याशी बोलत आहात हे फारच छान वाटत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत लेशपालने त्यांचे आभार मानले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.