कात्रजच्या नवीन बोगद्याजवळ तीन कारचा चक्काचूर
#आंबेगाव
कात्रज नवीन बोगद्याच्या बाहेर कोळेवाडी हद्दीत तीन कारच्या विचित्र अपघातात पुणेच्या दिशेने येणाऱ्या तीन गाड्यांचा चक्काचूर झाल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसली तरी झालेल्या अपघातात फुटलेल्या काचांचा खच, अस्ताव्यस्त पडलेले गाड्यांचे पार्ट, पलटी झालेल्या गाड्या आणि गाडीतून जिवाच्या आकांताने अपघातग्रस्तांनी फोडलेला टाहो पाहून प्रत्यक्षदर्शींना धडकी भरली.
उपस्थित नागरिकांनी तत्काळ जखमींना बाहेर काढले. शिवाय पोलिसांनाही वर्दी देण्यात आली. त्यानंतर, घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पोलीस पोहचले. तसेच जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये तत्काळ दाखल करण्यात आले. नवलेपूल ते नवीन कात्रज बोगदा, जांभूळवाडी दरीपूल हा परिसर अपघाताचा हॉटस्पॉट ठरत असून, यावर ठोस उपाय करण्याची योजना आखली जावी अशी मागणी होते आहे.
दुपारी तीनच्या सुमारास खेड-शिवापूरहून पुण्याच्या दिशेने येत असताना आमच्या समोरच अपघात घडला. मी तत्काळ अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी गेलो. शिवाय पोलिसांनाही कळवले. काही लोकांनी आम्हाला मदत केली तर जास्तीत जास्त लोक फोटो आणि व्हीडीओ काढण्यात दंग झाले होते. अपघातावेळी मदत करणे आपले पहिले कर्तव्य असायला हवे, अशी खंत प्रत्यक्षदर्शी दिलीप जगताप यांनी व्यक्त केली. दरम्यान अपघाताची बातमी मिळताच तत्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. यात जीवितहानी झाली नसल्याचे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांनी सांगितले.
feedback@civicmirror.in
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.