जिवे मारण्याची धमकी देत पोलिसाला बेदम मारहाण
रोिहत आठवले
TWEET@RohitA_mirror
मी हिंजवडीचा भाई आहे, तुझा मर्डर करतो, असे म्हणत वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसालाच रस्त्यावर खाली पडून बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार आयटी पार्क हिंजवडीमध्ये समोर आला आहे
या प्रकरणी दोनजणांना अटक करण्यात आली आहे. हिंजवडी फेज दोनमधील क्रोमा टी जंक्शन येथे सोमवारी (२७ फेब्रुवारी) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत हिंजवडी वाहतूक शाखेचे पोलीस नाईक सोमनाथ रामदास दिवटे (वय ३६) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमित साखरे, प्रथमेश हांडे आणि एका ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अमित साखरे आणि प्रथमेश हांडे या दोघांना अटक करण्यात आली आहे.
हिंजवडी आयटी पार्क परिसरात मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे अनेक वाहनचालक वळसा टाळण्यासाठी विरुद्ध दिशेने वाहने चालवतात. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत असतात. यातच सोमनाथ दिवटे हे सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास क्रोमा टी जंक्शन येथे नियमन करीत होते.
त्यावेळी एक हायवा (ट्रक) विरुद्ध बाजूने येत असल्याने दिवटे यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. याचा राग आल्याने हायवाचे मालक अमित साखरे आणि त्याचा मित्र प्रथमेश हांडे यांनी दिवटे यांच्यासोबत वाद घातला. तसेच त्यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.