'वो १६ दिन' आणि चिमुकल्याची सुटका

सावत्र आई आणि बाप मारतो म्हणून सहा वर्षांचा चिमुरडा कायम घाबरून असायचा. या चिमुरड्याला उचलून नेल्यास कोणी शोधणार नाही आणि त्याच्याकडे पाहून सहानुभूती मिळेल या विचाराने एका फिरस्त्याने चिमुरड्याचे अपहरण केले. मात्र, पोटचा पोर दिसेनासा झाला म्हणून आई-बापाने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी १६ दिवस चाकण परिसरातील १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण पाहून अखेर चिमुरड्याला शोधून काढले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 13 Mar 2023
  • 01:15 pm
'वो १६ दिन' आणि चिमुकल्याची सुटका

'वो १६ दिन' आणि चिमुकल्याची सुटका

तपासासाठी चाकण पोलिसांनी घेतली पोलीस पाटलांची मदत; १००पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची केली छाननी

रोिहत आठवले

rohit.athavale@civicmirror.in

TWEET@RohitA_mirror

सावत्र आई आणि बाप मारतो म्हणून सहा वर्षांचा चिमुरडा कायम घाबरून असायचा. या चिमुरड्याला उचलून नेल्यास कोणी शोधणार नाही आणि त्याच्याकडे पाहून सहानुभूती मिळेल या विचाराने एका फिरस्त्याने चिमुरड्याचे अपहरण केले. मात्र, पोटचा पोर दिसेनासा झाला म्हणून आई-बापाने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी १६ दिवस चाकण परिसरातील १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरण पाहून अखेर चिमुरड्याला शोधून काढले.

सुऱ्या ऊर्फ सुरेश लक्ष्मण वाघमारे (वय ४५, सध्या रा. पाठरवाडी, चाकण; मूळगाव देवघर वाकसई, मावळ) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या फिरस्त्याचे नाव आहे. तर पारख उमेश सूर्यवंशी या सहा वर्षांच्या चिमुरड्याची सुटका करण्यात आली आहे.

पारख हा २२ फेब्रुवारी रोजी खेळताना संध्याकाळी उशिरा घराजवळून बेपत्ता झाला होता. दुसऱ्या दिवशी त्याच्या अपहरणाची फिर्याद त्याच्या आईने दिली होती. लहान मुलाचे अपहरण झाल्याने चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे आणि पथकाने परिसरात शोधाशोध सुरू केली होती. मात्र, दुसऱ्या दिवसापर्यंत अपहरणकर्त्यांकडून पैशांची मागणी करण्यात आली नव्हती. काही दिवसांपूर्वी पिंपरी चौकातून चिमुरड्याचे अपहरण झाले होते. तसेच चाकण पट्ट्यात बेपत्ता झालेल्या लहान मुलीचा मृतदेह सापडला होता. या घटनांच्या पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांनी परिसरातील आणि शहरातून बाहेर जाणाऱ्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा पारख सुऱ्याबरोबर जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.

परंतु, सुऱ्याबाबत अधिक माहिती कोणाकडे नव्हती. तो फिरस्ता असून, त्याचा एक ठाव-ठिकाणा नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यामुळे पोलिसांनी सुऱ्या आणि पारख यांचे फोटो खेड, मावळ परिसरात व्हायरल केले. तसेच खेड आणि मावळ परिसरातील सगळ्या पोलीस पाटलांची भेट घेऊन त्यांना या दोघांबाबत माहिती मिळते का, याची चाचपणी करण्यास सांगितले. एकीकडे पोलीस पाटलांची मदत घेतली जात होती. तर दुसरीकडे पोलिसांनी सुऱ्याच्या मूळगावी जाऊन चौकशी केली. तसेच पिंपरी चौकातून बेपत्ता चिमुरडा मावळ भागात सापडला असल्याने आणि त्याला लोणावळा भागात नेल्याचे तपासात उघड झाल्याने चाकण पोलिसांनी मावळ भागावर लक्ष केंद्रित केले होते. पारख सुऱ्याबरोबर सहज जात असल्याने या दोघांची ओळख कशी झाली, याची चौकशी पोलिसांनी केली. पारख याला सावत्र आई आणि बाप मारत असल्याने तो घाबरून राहायचा. तसेच सुऱ्या अधून मधून त्याला चॉकलेट देत असल्याचे उघड झाले होते. दरम्यान, कार्ला भागातील पोलीस पाटलाने सुऱ्या दिसल्याची माहिती शुक्रवारी (१० मार्च) चाकण पोलिसांना कळविली. त्यामुळे पोलिसांनी कार्ला परिसरात जाऊन शोध घेतला 

असता सुऱ्या आणि पारख पहाटे सापडले.

सुऱ्याकडे चौकशी केली असता, सावत्र आई आणि बाप मारतो म्हणून पारख कायम घाबरून असायचा. त्यामुळे त्याला उचलून नेल्यास कोणी शोधणार नाही आणि त्याच्याकडे पाहून मला सहानुभूतीमुळे पैसे मिळतील, या विचाराने त्याचे अपहरण केल्याची कबुली पोलिसांकडे दिली.  सहायक निरीक्षक प्रसन्न जराड, विक्रम गायकवाड, सुरेश हिंगे, कर्मचारी राजू जाधव, संदीप सोनवणे, हनुमंत कांबळे, निखिल शेटे, भैरोबा यादव आदींसह पथकाने हा 

तपास केला आहे. शनिवारी सकाळी पारख याला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story