ही तर दंडेल शाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडला भेट दिल्याने राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्राला मोठे महत्त्व असल्याचे अधोरेखित झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शनिवार-रविवार अशा दोन दिवसांच्या भेटीत सर्वत्र पोलीसराज आणि त्यांची दंडेलशाही असल्याचे जाणवत होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vijay Chavan
  • Mon, 7 Aug 2023
  • 10:44 am
ही तर दंडेल शाही

ही तर दंडेल शाही

अमित शाह यांच्या पुणे, पिंपरी -चिंचवड भेटीत पोलीसराज, संभाव्य आंदोलने टाळण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते नजरकैदेत

विजय चव्हाण

vijay.chavan@civicmirror.in

TWEET@vijayCmirror

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुणे आणि  पिंपरी-चिंचवडला भेट दिल्याने राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्राला मोठे महत्त्व असल्याचे अधोरेखित झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शनिवार-रविवार अशा दोन दिवसांच्या भेटीत सर्वत्र पोलीसराज आणि त्यांची दंडेलशाही असल्याचे जाणवत होते.     

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये येणार होते. केंद्र सरकार सध्या बहुराज्य सहकारी संस्थांना (मल्टीस्टेट) त्यांच्या व्यवसायात सुलभता वाढविण्यासाठी डिजिटलवर भर देत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्राने विकसित केलेल्या बहुउद्देशीय सहकारी संस्थाच्या एकात्मिक पोर्टलचे उद्‌घाटन सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी दुपारी चिंचवड येथे झाले. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना सीआरपीसी १४९ च्या नोटिसा दिल्या होत्या. त्यामुळे पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव जमवणे, पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास मनाई केली होती. गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यावेळी कोणत्याही प्रकारचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.

कोणत्याही प्रकारचे निवेदन देणार नाहीत. काळे झेंडे दाखविणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. कायम सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नोटिशीचा भंग होणार नाही, याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी, असे नोटिशीत म्हटले होते. 

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या मोहननगर येथील निवासस्थानी सकाळी सहापासून पोलीस बंदोबस्त ठेवला होता. भापकर यांना तर नजरकैदेतच ठेवण्यात आले होते. पोलिसांनी खबरदारी म्हणून विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांना सीआरपीसी १४९ च्या नोटिसा दिल्या होत्या. मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांना नोटिसा दिल्या होत्या. याशिवाय, आम आदमी पार्टीचे युवक शहराध्यक्ष रविराज काळे यांना सकाळी दहापासून सांगवी पोलीस स्टेशन येथे नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेश संघटक ऋषिकेश पिराजी कानवटे व प्रकाश घोडके यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले होते.

युवक काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड 

 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी सेनापती बापट रोड येथे ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे बसवून ठेवून नंतर सोडून देण्यात आले.

अमित शाह यांचे आज पुण्यात विविध ठिकाणी कार्यक्रम होते. सेनापती बापट रोड येथील एका हॉटेलमध्ये कार्यक्रम होता. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन म्हणाले की, देशात मणिपूर असेल, हरियाणा असेल, तेथे कमालीची संवेदनशील परिस्थिती  आहे. असे असताना केंद्रीय गृहमंत्र्यांची गरज पुणे शहराला नसून मणिपूर आणि हरियाणाला आहे. हे दबाव तंत्र प्रत्येक ठिकाणी चालणार नाही. ही तर सुरुवात आहे. उद्या लोक जर रस्त्यावर उतरले तर चाणक्यनीती चालणार नाही.

राहुल शिरसाट म्हणाले की, आज नागरिकांचा आवाज जरी दाबण्याचा प्रयत्न केला तरी भविष्यात युवक काँग्रेस म्हणून आम्ही आवाज उठवायला कमी पडणार नाही. पुणे शहराध्यक्ष राहुल शिरसाठ, प्रदेश सचिव राजू ठोंबरे, वाहिद निलगर, आशुतोष जाधवराव, योगेश यादव, अक्षय माने, प्रसाद वाघमारे, रुनेश कांबळे, सुमित लांडगे यांनाही ताब्यात घेण्यात आले होते. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story