तहानलेले हरीण विहिरीत; वनखात्याने केली सुटका
विजय चव्हाण
दौंडजवळील बेलसर येथील भोंगळे मळा परिसरातील रहिवासी महिंद्र हिंगणे यांच्या ८० फूट खोल विहिरीत पडलेल्या हरणाला वनविभागाकडून जीवदान मिळाले आहे. पाण्याच्या शोधात आलेले हरीण विहिरीत पडल्याचे स्थानिक शेतकऱ्याच्या निदर्शनास आल्याने हरिणाचे प्राण वाचवणे शक्य झाले
स्थानिक शेतकऱ्याने विहिरीत हरीण पडल्याची माहिती जेजुरीतील समाजसेवक भगवान डिखळे यांनी दिली. त्यांनी तातडीने याबाबत वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाचे राहुल रासकर, विशाल चव्हाण, कोळी, पवार, सागर शिरतोडे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तीन तासाच्या प्रयत्नानंतर हरणाला बाहेर काढण्यात आले. त्याला निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्यात आले. जयाद्री डोंगर परिसरातील हरणे व अन्य प्राणी पाण्याच्या शोधात फिरत मनुष्य वस्ती आणि धोकादायक ठिकाणी फिरताना आढळून आली आहेत. पाणीटंचाईमुळे प्राणी लोकवस्तीमध्ये येत आहेत. त्यातूनच ते विहिरीत पडण्याच्या घटना घडत आहेत. हरणांची संख्या जास्त आहे. उन्हाळ्यात डोंगररांगात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने पाण्याच्या शोधार्थ वन्यप्राणी मानवी वस्तीकडे धाव घेतात.
दरम्यान, कुत्र्यांच्या हल्ल्यात, तसेच महामार्गावरील अपघातात वन्य प्राण्यांना जीव गमवावा लागल्याच्या घटना परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे वनविभागाच्या वतीने परिसरातील डोंगरांत मोठ्या प्रमाणात पाणवठे तयार करून त्यामध्ये पाणी साठवण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या आधीही ३ जून रोजी रात्रीच्या अंधारात भरकटलेले उदमांजर मावळ तालुक्यातील तोलानी महाविद्यालयालगतच्या विहिरीत पडले होते. त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या स्वयंसेवकांनी दोरखंडाच्या साहाय्याने विहिरीत उतरून, तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या उदमांजराला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले होते.
गातील वनक्षेत्रात हरीण व काळवीटांची संख्या जवळपास पाच हजारांच्या वर आहेत. त्यातही या संख्येत दरवर्षी साधारणतः १० टक्के वाढ होत असते. हा भाग अवर्षणप्रवण असल्याने दरवर्षी उन्हाळ्यात वन्यजीवांचे अन्न-पाण्यावाचून हाल होत असतात. पावसाने दगा दिल्याने डिसेंबरपासूनच या भागात पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. जंगलातील पाणीसाठे आटल्याने वनविभागाच्या वतीने वनक्षेत्रात विविध ठिकाणी ९ हजार लीटर क्षमतेचे एकूण २० ‘वॉटर होल’ अर्थातच कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून, हे पाणवठे हरीण, काळवीट आदी वन्यजीवांची तहान भागवत आहेत.
डोंगर-दऱ्यांच्या या जंगलात अन्न-पाण्याची समस्या असल्याने हरणे नागरी वस्तीत स्थलांतरित होतात. मात्र, राखीव वनसंवर्धन क्षेत्र तयार करून विविध विकासकामे वनविभाग राबवत असल्याने आता हरणांना हे जंगल आपले वाटू लागले आहे. मागील वर्षी चराईबंदी करून राखीव कुरण ठेवल्याने आजही जंगलात हिरवे नसले, तरी वाळलेले गवत आहे. यावर हरणांची गरज भागली जात आहे; मात्र पाण्याची चिंता मिटलेली नाही
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.