साहेबांची मांडीलाला मांडी, कार्यकर्त्यांची हाती काळी झेंडी
विजय चव्हाण
गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार आणि अराजकाची परिस्थिती आहे. त्या विषयी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या पुणे दौऱ्यात मंगळवारी (१ ऑगस्ट) ९३ वर्षांचे डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली ‘इंडिया फ्रंट पुणे’ च्या वतीने काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात येणार आहेत.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शरद पवार यांची उपस्थिती असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी होणार आहेत. याच दिवशी दिल्ली सरकारच्या अधिकाराबाबत केंद्र सरकारकडून काढण्यात आलेल्या अध्यादेशाबाबत मतदान होण्याची शक्यता असताना पवार हे मोदींसाठी पुण्यात थांबणार की, राज्यसभेत मतदानासाठी जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार असले, तरी हा विषय वेगळा असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निषेध आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत, असे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केले. ‘या कार्यक्रमास उपस्थित राहू नये’, अशी विनंती करण्यासाठी इंडिया फ्रंट पुणेच्या नेत्यांनी पवार यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि इंडिया फ्रंट पुणेचे निमंत्रक डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांच्या विरोधात निदर्शने होणार आहेत.
इंडिया फ्रंटने दिलेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात १ तारखेला सकाळी ११ वाजता अलका चौकात काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात येणार आहे. तसेच पुणेकरांनी काळे कपडे घालून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन इंडिया फ्रंटच्या वतीने करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी सांगितले की, मोदींविरोधातील राजकीय पक्षांच्या नेत्यांची एकत्र पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, जनता दल समाजवादी पार्टी, शेतकरी कामगार पक्ष आणि आम आदमी पक्ष सामील होणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन परिस्थिती पाहावी आणि चर्चा करावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे.
या कार्यक्रमासाठी शरद पवारांना देखील आमंत्रण देण्यात येणार असल्याचे रोहित टिळकांनी सांगितले. ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच पवार काका-पुतण्यासह बडे नेते मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार आहेत.
असा असेल दौरा...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यातील लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कार्यक्रम हा महत्त्वाचा कार्यक्रम आहे. पुणे दौऱ्यात पंतप्रधानांचे विविध कार्यक्रमही आयोजित केले आहेत. यामध्ये मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणे, विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीचाही समावेश आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. तिथे पूजा-अर्चा केल्यानंतर सकाळी ११.४५ वाजता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. १२.४५ मिनिटांनी मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
मेट्रो १ च्या दोन मार्गिकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानक या दोन मार्गिकांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. २०१६ मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजीनगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक या महत्त्वाच्या ठिकाणांना जोडणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.