पुण्यात १५ जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होणार
पुण्यात सध्या पाणीकपातीबाबत कोणताही निर्णय नाही, १५ जुलैपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल, त्यामुळे पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार नाही, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
यंदाच्या उन्हाळ्यात पुणेकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज बांधला जात होता. शिवाय आठवड्यातील एक दिवस पाणी कपात होत असल्याच्या तक्रारी देखील आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित बैठक पार पडली. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “पुणे शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात झाल्यास काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. या समस्येबाबतच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी महापालिकेने आठ दिवसांत उपाययोजना सादर करण्याचे जाहीर केले आहे.”
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “संभाव्य टंचाई दूर करण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच शेतीसाठी पाणी जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन सुरू आहे. जवळपासच्या राज्यातून चारा आणण्याची तयारी देखील सुरू आहे.”
“सध्या पुणे शहराला १५ जुलैपर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर धरणात मुबलक पाणीसाठा नसल्यास आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करावी लागू शकते. असे केल्यास ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहील”, असेही चंद्रकांत पाटील बैठकीत बोलताना म्हणाले.