पुण्यात येत्या काही तासात गारपीट होणार
पुण्यात पुढील ३ ते ४ तासात गारपीट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज सकाळी शहरातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. तर दिवसभर ढगाळ वातावरण होते.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून आलेल्या आर्द्रतेच्या प्रवाहामुळे पुणे आणि आजूबाजूच्या भागात शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तसेच दिवसाचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहिल असा अंदाज हवामान विभागाने आदल्या दिवशी वर्तवला होता.
पुण्यासह लातूर, परभणी या जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलका पाऊस पडेल. तसेच सांगली, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार शहरांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.