पद्मश्री गिरीश प्रभुणेंच्या आश्रमशाळेत चोरी
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
पद्मश्री गिरीष प्रभुणे यांनी स्थापन केलेल्या 'पुनरुत्थान समरसता गुरुकुलम' या आश्रमशाळेत आणि क्रांतिवीर चापेकर विद्यालयातील वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. १६ ते २६ जुलै या दरम्यान, चिंचवडगाव येथे हा प्रकार घडला आहे.
क्रांतिवीर चापेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पूनम काशिनाथ गुजर (वय ४०, रा. क्रांतिवीर चापेकर विद्यालय, चिंचवडगाव) यांनी याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पद्मश्री गिरीष प्रभुणे यांनी नक्षलग्रस्त भागासह आदिवासींच्या मुलांसाठी चिंचवडगाव येथे 'पुनरुत्थान समरसता गुरुकुलम' ही आश्रमशाळा सुरू केली आहे. एकल पालक किंवा दोन्ही पालक नसलेली शेकडो मुले या निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेतात. गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी कोणत्याही स्वरूपाचे अनुदान न घेता ही शाळा स्वत: प्रभुणे आणि नागरिकांच्या तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराच्या मदतीवर चालविली जाते.
शहरासह देशभरातील काही दानशूर व्यक्ती वस्तू, धान्य, कपडे आणि पैसे येथील मुलांसाठी देत असतात. यातील काही पैशांमधून विकत घेण्यात आलेले सीलिंग फॅन, शिवणकाम साहित्य पेटी, शिलाई मशिन, कापड तसेच याच आश्रमशाळेच्या आवारात असलेल्या क्रांतिवीर चापेकर शाळेच्या प्रयोगशाळेतील काही साहित्य अशा एकूण ४२ हजार ८०० रुपयांच्या वस्तू चोरीला गेल्या आहेत.
महापालिकेच्या गावडे जलतरण तलावाजवळ नदीपात्राला लागून असलेल्या भूखंडावर ही आश्रमशाळा उभी राहिली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून येथील नदीवरील नियोजित उड्डाणपुलाचे काम महापालिकेच्या वतीने सुरू आहे. त्यामुळे पद्मश्री प्रभुणे यांच्या आश्रम शाळेच्या भूखंडाचे दोन भाग झाले आहेत. रस्त्याच्या कामामुळे आश्रम शाळेची संरक्षक भिंत तुटलेली आहे. त्यामुळे याचाच फायदा घेऊन, चोरट्यांनी आश्रम शाळेत प्रवेश केल्यानंतर उघड्या दारांमधून प्रयोगशाळा आणि मुलांना स्वयंरोजगार शिकविला जाणाऱ्या शिवणकाम विभागातून साहित्य चोरून नेले आहे. राष्ट्रपती, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदींनी या आश्रम शाळेला यापूर्वी भेट दिलेली आहे. त्यानंतरही महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून ही शाळा दुर्लक्षित राहिली आहे. शाळेचे वीजबील, पाणी पुरवठा आणि आता सुरक्षितता हे मुद्दे कायमच चर्चिले गेले आहेत. चिंचवड पोलीस या चोरीबाबत तपास करीत आहेत.