कामगाराची तलवार राजकारणातही तळपली

अस्सल पुण्याच्या मुशीत वाढलेले आणि नगरसेवकपदापासून खासदारकीपर्यंत पोहचलेले नेते म्हणून गिरीश बापट यांचे नाव घ्यावे लागेल. कामगार नेता म्हणून कार्याची सुरूवात केलेले बापट नगरसेवक, पाचवेळा आमदार आणि २०१९ च्या निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असूनही सर्वपक्षीय मैत्रीचे संबंध असणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांची गणना करावी लागेल.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 30 Mar 2023
  • 10:59 am

The worker's sword was also sharpened in politics

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

अस्सल पुण्याच्या मुशीत वाढलेले आणि नगरसेवकपदापासून खासदारकीपर्यंत पोहचलेले नेते म्हणून गिरीश बापट यांचे नाव घ्यावे लागेल. कामगार नेता म्हणून कार्याची सुरूवात केलेले बापट नगरसेवक, पाचवेळा आमदार आणि २०१९ च्या निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असूनही सर्वपक्षीय मैत्रीचे संबंध असणाऱ्या मोजक्या नेत्यांमध्ये त्यांची गणना करावी लागेल. नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी व्हीलचेअरवरून कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थिती लावली होती. हे त्यांचे शेवटचे सार्वजनिक दर्शन ठरले.

गिरीश बापट यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात झाला. तळेगाव दाभाडे येथे प्राथमिक आणि न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. बीएमसीसी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर ते १९७३ मध्ये ते टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले. इथेच त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात झाल्याचे मानले जाते. त्यांनी कामगार नेता म्हणून इथे काम केले. तत्कालिन प्रशासनाविरोधात त्यांनी अनेक आंदोलने केली. कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते झटले. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९७५ ते१९७७ साली देशात आणीबाणी लागू केली. त्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक  संघ, जन संघाचे कार्यकर्ते तुरुंगात गेले. बापट यांनीही या कालावधीत तुरुंगवास भोगला. त्यांनी आणीबाणीत नाशिक जेलमध्ये १९ महिन्यांचा कारावास भोगला.

तुरुंगात शिक्षा भोगून आल्यानंतर बापट यांच्या राजकीय कारकीर्दीला आणखी धार चढली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि संघ परिवारातील विविध संस्थांच्या पदांची जबाबदारी अत्यंत यशस्वीपणे सांभाळली. राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असतानाही त्यांनी संघाचे दसरा संचलन चुकवले नाही. इतके ते आंतरबाह्य संघाचे कार्यकर्ते होते. भारतीय जनता पक्षाचे पुण्यात फारसे अस्तित्व नसताना त्यांनी पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात आपले स्थान निर्माण केले. पुढे पंचवीस वर्षे त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. तीनवेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार आणि एकदा खासदार अशी त्यांची भलीमोठी राजकीय कारकीर्द आहे. तब्बल चाळीस वर्षे त्यांनी पुण्याच्या राजकारणामध्ये आपली वेगळी छाप सोडली. पत्रकार, सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते, महापालिकेतील जुने सहकारी यांच्याशी त्यांनी कधीच संपर्क तोडला नाही. मंडई, टिळक रस्त्यावरील गिरीजा हॉटेलजवळील कट्ट्यावर मंत्री झाल्यानंतरही ते हजेरी लावत. विविध गणेश मंडळे आणि देवस्थानच्या प्रतिनिधींशीही त्यांचा वैयक्तिक संपर्क होता. त्यामुळे सर्वच पक्षात त्यांचे चांगले मित्र होते.   

 

पहिल्यांदा १९८३ साली झाले नगरसेवक

बापट यांनी आणीबाणीनंतर सक्रीय राजकारणात काम सुरू केले. ते १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात नगरसेवक झाले. त्यानंतर ते सलग तीन टर्म नगरसेवक होते. महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष होण्याचा मान त्यांच्या नावावर आहे. सर्वपक्षीय मैत्री त्यांनी जपल्याने हे शक्य झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशीही त्यांचे सख्य होते. अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांना मानणारे स्थानिक नेते. मात्र, त्यानंतरही बापट, काकडे आणि सुरतवाला यांचे त्रिकूट शहरात प्रसिद्ध होते.  

कामगार म्हणून कंपनीचे ऋण फेडले...

बापट हे टेल्को कंपनीत कामगार म्हणून काम करीत होते. तिथे कामगार नेता म्हणून त्यांनी कामास सुरुवात केली. हा अनुभव त्यांच्या पुढील जीवनातील राजकीय प्रवासात कामी आला. राज्य परिवहन विभागाचे ते १९९८-९९ साली अध्यक्ष होते. त्यावेळी मंदी असल्याने ऑटोमोबाईल क्षेत्रासमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी टाटा मोटर्सला (पूर्वीचे टेल्को) १ हजार बसची ऑर्डर दिली होती. याच कंपनीच्या जीवावर आपण मोठे झालो याचे भान त्यांनी ठेवले. ते टाटा कंपनीतील कामगारांच्या मेळाव्यालाही आवर्जून उपस्थित रहात. टाटा परिवारामुळेच मला राजकीय जीवनात यश मिळाल्याचे ते जाहीरपणे सांगत असे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story