हॉटेलमध्ये महिलेने मािगतली भाकरी, पोलिसालाही धक्काबुक्की
सीविक मिरर ब्यूरो
जेवणात ज्वारीची भाकरी न मिळाल्याने मद्यधुंद अवस्थेतील एका महिलेने मार्केट यार्ड येथील वाहनतळाजवळ असलेल्या श्रीसागर हाॅटेलमध्ये गोंधळ घातला. यावेळी तिने पोलिसांनाही जुमानले नाही. एका महिला पोलिसाला धक्काबुक्की करेपर्यंत तिची मजल गेली.
या प्रकरणी नूतन सुभाष सुर्वे (वय ४५, रा. केदारीनगर, वानवडी) या महिलेस अटक करण्यात आली आहे. पोलीस नाईक वनिता माने यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी (दि. २२) रात्री मद्यधुंद अवस्थेत असलेल्या नूतन सुर्वेने जेवण करत असलेल्या इतर ग्राहकांच्या अंगावर आणि ताटात पाणी ओतले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या वनिता माने यांना सुर्वेने धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच उपाहारगृहात गोंधळ घातल्याप्रकरणी या महिलेस अटक करण्यात आली आहे.
वनिता माने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. गुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डच्या वाहनतळाजवळ श्रीसागर हाॅटेल आहे. हाॅटेलच्या शेजारीच मार्केट यार्ड पोलीस ठाणे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूतन सुर्वे ही श्रीसागर हाॅटेलमध्ये जेवण करण्यासाठी आली होती. तिने मद्यपान केले होते. याशिवाय अजून दुसरी नशा केली होती. रात्री ११ वाजता या ठिकाणी जेवणात ज्वारीची भाकरी न मिळाल्याने सुर्वेनी गोंधळ घालायला सुरुवात केली. तिने उपाहारगृहातील कामगार आणि व्यवस्थापकांनाही शिवीगाळ केली. त्याचबरोबर जेवण करत असलेल्या इतर ग्राहकांच्या अंगावर आणि ताटात पाणी ओतले. त्यांनाही शिवीगाळ केली.
या घटनेची माहिती हाॅटेल व्यवस्थापकांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दिली. त्यावेळी पोलीस कर्मचारी वनिता माने या नाईट ड्यूटीला होत्या. त्या उपाहारगृहात पोहोचल्या आणि महिलेला शांत करू लागल्या. परंतु सुर्वेने माने यांनाच उलटसुलट बोलायला सुरुवात केली. ‘‘मी पैसे देऊन जेवते. हॉटेलवाले काय फुकट थोडेच देत आहेत. गुगलवर दाखवतात येथे चांगले जेवण मिळते मात्र प्रत्यक्षात उलट चित्र आहे,’’ असे म्हणत तिने माने यांना ‘‘तुला बघून घेईन,’’ अशी धमकी दिली. त्यांच्या नावाची पट्टी खेचली तसेच धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणला आणि सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी अखेर सुर्वेला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.