पिस्तुल-कट्ट्यांनी बदलला पुण्यात यायचा मार्ग
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
अवैध पिस्तुले यापूर्वी बिहार आणि उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्रात किंबहुना पुण्यात येत होती. परंतु, आता जळगाव जिल्ह्यातील चोपडा परिसराला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील उमरठी या गावातून पिस्तुलांची तस्करी वाढली असून, पोलिसांसाठी हा डोकेदुखीचा विषय ठरत आहे.
गुन्ह्यांमध्ये वापरण्यासाठी अवैध पिस्तुलांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पूर्वी झारखंडमध्ये देखील पिस्तुले बनवली जात होती. त्यानंतर आता गेल्या काही वर्षात उमरठी गाव यासाठी कुप्रसिद्ध झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या सीमेवरील नदीचा पूल ओलांडला की उमरठी गाव येते. मध्य प्रदेशात असलेल्या या गावात जाण्यासाठी महाराष्ट्रातील लोक शक्यतो स्वत:च्या वाहनाने किंवा बसने चोपडा तालुक्यात जातात. तेथून रिक्षा, दुचाकीवरून उमरठी येथे जातात. चोपडामार्गे, अंमळनेर, धुळे, तसेच सेंधवामार्गे देखील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा प्रवास सध्या वाढला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेतील दरोडा प्रतिबंधक विभाग, गुंडा स्कॉड आणि युनिट चारच्या पथकाने मागील सहा महिन्यात येथून आलेली ३५ हून अधिक गावठी पिस्तुले, कट्टे जप्त केले आहेत. महाराष्ट्राबरोबरीनेच मध्य प्रदेशच्या शेजारील राज्यात सध्या याच उमरठी गावातून मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्र पुरवठा केला जात आहे. या गावात ठराविक समाजाचे लोक राहात असून, अन्य लोकांना येथे घर भाडेतत्त्वावरदेखील दिले जात नाही. घर विक्री आणि खरेदीसाठी या अवैध पिस्तूल-गावठी कट्ट्यांचा व्यवसाय करणाऱ्यांची परवानगी घ्यावी लागत आहे. पोलिसांनादेखील येथे तपासासाठी जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पोलिसांवर हल्ला होण्याचे प्रकार येथे घडतात.
महाराष्ट्रासह अन्य कोणत्याही राज्यातील पोलीस या गावात येणार असल्याची माहिती मिळताच अवैध शस्त्र पुरवणारे एजंट कुटुंबाला गावातच सोडून पसार होतात. या गावाला घनदाट जंगलाचा परिसर लागून असल्याने बऱ्याचदा शस्त्रसाठा तेथे लपवून ठेवलेला असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून उघड झाले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंतर्गत दोन वर्षांपूर्वी शस्त्र विरोधी पथक कार्यरत होते. तेव्हा या पथकाने एकाच वेळेस ४७ अवैध पिस्तुले जप्त केली होती. परंतु, मध्य प्रदेशातील सिंघाना आणि धार या गावांमधून हा शस्त्रांचा काळाबाजार चालत होता. पोलिसांनी एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केल्याने या गावातून आता पुणे जिल्ह्यात पिस्तुले विक्री केली जात नसल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. परंतु, उमरठी गावातून होणारी पिस्तुलांची तस्करी पिंपरी-चिंचवडसह पश्चिम महाराष्ट्राच्या पोलिसांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे.
किशोर आवारे यांच्या खुनासाठी, त्यानंतर या खुनाचा बदला घेण्यासाठी, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांच्या हत्येचा कट, व्यावसायिक राजू माळी यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी आणण्यात आलेली बहुतांश पिस्तुलेही याच उमरठी गावातून आणल्याचे उघड झाले आहे. गुन्हेगारी जगतात सध्या या गावाला विशेष महत्त्व आले आहे. या गावातील एजंट पुण्यातील गुन्हेगारांच्या संपर्कात असतात. एकाने पिस्तुले आणली की तो दुसऱ्या साथीदाराला उमरठीमधील एजंटचा संपर्क करून देत असल्याने ही साखळी आता वाढत गेली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.