पथ विभागाचा ‘भूमिगत’ पराक्रम!
विशाल शिर्के
TWEET@vishal_mirror
रस्ता तयार करताना जमिनीखालील विजेच्या वाहिन्यांवर दुरुस्तीसाठी डक्ट बसवले जातात. यामुळे आकस्मिक बिघाड झाल्यास दुरुस्ती करणे सहज शक्य होते. मात्र, सिमेंटचा रस्ता तयार करताना असे ब्लाॅक बसवल्याचे साधे भान महापालिकेच्या पथविभागाने न राखल्यामुळे वीजपुरवठ्यातील समस्या दूर करण्यासाठी वाघोलीतील रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदण्याची वेळ महावितरणवर आली.
शहरात महावितरणची वीजवाहिनी भूमिगत आहे. रस्त्याच्या कडेने ही वाहिनी नेण्यात आलेली आहे. आकस्मिक बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी या वाहिनीवर डक्ट बसवले जातात. मात्र, ते न बसवल्याने वाघोलीमधील भावडी रस्ता जेसीबीच्या साहाय्याने खोदावा लागला. सिमेंट रस्ता तयार करताना अगदी साधे भान न राखल्याने सिमेंट रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे.
महापारेषण कंपनीच्या अतिउच्च दाब लोणीकंद उपकेंद्रात रविवारी आकस्मिक दुरुस्ती कामामुळे वाघोलीमधील सुमारे ९५०० वीजग्राहकांचा वीजपुरवठा रात्रभर खंडित होता. महावितरणचे अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी रात्रभर दुरुस्ती करून सोमवारी (दि. २७) सकाळी साडेआठ वाजता वीजपुरवठा सुरळीत केला. मात्र, नेमका कोठे बिघाड झाला आहे, हे शोधण्यासाठी सिमेंट रस्ता जोसीबीच्या साहाय्याने खोदावा लागला.
शहरात सुमारे १४०० किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमुळे त्यात सुमारे ३०० किलोमीटर रस्त्यांची भर पडली आहे. यातील बहुतांश रस्ते सिमेंटचे आहेत. अलीकडे गल्ली-बोळातही सिमेंटचेच रस्ते करण्यात येत आहेत. वाघोलीतील संबंधित रस्ता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारित येत आहे. या रस्त्याचे महापालिकेकडे अद्याप हस्तांतर झाले नसल्याची माहिती महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली.
वाघोली परिसराला पूर्वरंग २२/२२ केव्ही उपकेंद्राद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. या उपकेंद्राला महापारेषणच्या लोणीकंद अतिउच्चदाब उपकेंद्रामधून २२ केव्ही वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. रविवारी (दि. २६) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पूर्वरंग वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यामुळे येथील उपकेंद्राला करोल-२ या वीजवाहिनीद्वारे पर्यायी वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र दुपारनंतर महापारेषणच्या लोणीकंद अतिउच्च दाब उपकेंद्रामध्ये तातडीचे आकस्मिक दुरुस्तीचे काम उद्भवले. ते करणे अत्यंत गरजेचे असल्याने सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत या अतिउच्चदाब उपकेंद्रातून पुरवठा होणाऱ्या महावितरणच्या वाघेश्वर, संघार आणि करोला-२ या तिन्ही २२ केव्ही वाहिन्यांची वीज बंद ठेवण्यात आली. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर महावितरणच्या तीनही वाहिन्यांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र अर्ध्या तासात वाघेश्वर आणि करोला-२ या वाहिन्यांमध्ये बिघाड होऊन वीजपुरवठा पुन्हा खंडित झाला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.