टोईंग व्हॅनचे कंत्राट संपले आणि वाहतुकीची शिस्तही
रोहित आठवले
TWEET@RohitA_mirror
रस्त्यावर अस्ताव्यस्त पद्धतीने लावलेल्या दुचाकींवर कारवाई करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या टोईंग व्हॅनचे कंत्राट संपल्याने पिंपरी-चिंचवड महानगरातील वाहतूक कोंडीत भर पडली आहे. टोईंग व्हॅन नसल्याने वाहतुकीला शिस्त लावणाऱ्या पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. शहरामधील चौका-चौकात बेशिस्तपणे वाहने लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाहतूक पोलिसांना त्यांचे हे मुख्य काम सोडून चुकीच्या पद्धतीने लावलेल्या दुचाकी बाजूला करण्याचे काम सध्या करावे लागत आहे.
पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलीस आयुक्तालय होण्यापूर्वी पुणे शहर पोलिसांकडून या भागासाठी टोईंग व्हॅन, क्रेन दिल्या जात होत्या. पाच वर्षांपूर्वी स्वतंत्र आयुक्तालय झाल्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनेक अत्यावश्यक सोयी पोलिसांना करून देण्यात आल्या आहेत. मात्र, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत महापालिका हद्द, पीएमआरडीए, नगर परिषदा आणि ग्रामपंचायतींचा भाग येतो. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने त्यांच्या हद्दीत येणाऱ्या वाकड, सांगवी, पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि एका संयुक्त भागासाठी सहा टोईंग व्हॅन कारवाईसाठी दिल्या होत्या, परंतु २४ जूननंतर संबंधितांचे कंत्राट संपले आहे. त्यामुळे महापालिका आणि पर्यायाने पोलिसांना दिलेल्या टोईंग व्हॅन शहरात आता फिरताना दिसत नाहीत.
या टोईंग व्हॅनमध्ये एक पोलीस कर्मचारी आणि किमान ५ मुले चुकीच्या पद्धतीने रस्त्यांवर लावलेल्या दुचाकी उचलून नेण्याचे काम करीत होते. त्यांच्या कारवाईच्या भीतीने वाहनचालक योग्य ठिकाणी पार्किंग करत होते. 'नो-पार्किंग' मध्ये लावलेल्या दुचाकी, चौकात अस्ताव्यस्तपणे लावलेल्या दुचाकी तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या दुचाकींवर कारवाई केली जात होती. यातून दंडरूपी मिळणारा महसूल हा महापालिका आणि पोलिसांना दिला जात होता, पण आता महापालिकेचेच कंत्राट संपल्याने पोलिसांना बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यास मर्यादा येऊ लागल्या आहेत.
सर्वाधिक वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे कायमच रहदारी मंदावणाऱ्या हिंजवडी भागात तर महापालिकेने टोईंग व्हॅन दिली नव्हती. त्यामुळे संयुक्त परिसरासाठी दिलेल्या टोईंग व्हॅनमधून हिंजवडी भागात दुचाकींवर कारवाई केली जात होती. सध्या या भागात मेट्रोचे काम सुरू असल्याने येथे रस्त्यावर लावलेल्या दुचाकी आणि कार उचलून नेण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर पिंपळे सौदागर, रहाटणी, कोकणे चौक, पिंपळे निलख, दापोडी ते निगडी मुख्य रस्ता, पिंपरी बाजारपेठ, निगडी प्राधिकरण तसेच मोशी स्पाईन रोड परिसरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी या टोईंग व्हॅनचा काही प्रमाणात फायदा होत होता.
'नो-पार्किंग' मध्ये लावण्यात आलेल्या वाहनांवर ऑनलाईन पावती करायची झाल्यास एका कर्मचाऱ्याची किमान १० मिनिटे जातात. चौका-चौकात वाहतूक नियमनासाठी नेमलेल्या वाहतूक पोलिसांना त्यांचे हे मुख्य काम सोडून चुकीच्या पद्धतीने लावलेल्या दुचाकी बाजूला करण्याचे काम सध्या करावे लागत आहे.
पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांच्या सहायक पोलीस आयुक्तांकडून महापालिकेला याबाबत पत्रव्यवहार केला आहे. येत्या चार ते आठ दिवसात टोईंग व्हॅनचे कंत्राट पूर्ववत करून ही वाहने पोलिसांना दिली जातील, असे मागील पंधरा दिवसांपासून सांगितले जात आहे. मात्र, महिना उलटून गेला तरी ही वाहने न मिळाल्याने दुचाकींबरोबरीनेच आता कार देखील चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर लावल्याचे दिसून येते.
दुचाकींवर कारवाई करणाऱ्या टोईंग व्हॅनमधील पोलीस कर्मचारी वेळप्रसंगी रस्त्यात एखादी कार अथवा मोठे वाहन लावलेले आढळून आल्यास त्यांच्यावर ऑनलाईन दंड करून, क्रेन बोलावून ही वाहने बाजूला केली जात होती. मात्र, दुचाकींवरच कारवाई करणाऱ्या टोईंग व्हॅन दिसेनाशा झाल्याने आता सगळ्याच प्रकारची वाहने रस्त्यावर बिनदिक्कतपणे लावली जात आहेत. पावसाळ्यामुळे रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य असून, पोलिसांना हे खड्डे बुजवण्याचे कामही वेळप्रसंगी करावे लागत आहे. त्यातच आता दुचाकींवर कारवाई करण्यासाठी आवश्यक टोईंग व्हॅन नसल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.