औषधांसाठीची चिठ्ठी बंद, खासगीतील गर्दी कायम
राजानंद मोरे
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. संजीव ठाकूर यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत खासगी दुकानांमधून रुग्णांना औषध घ्यावी लागू नयेत यासाठी चिठ्ठी पध्दत बंद करणार असल्याचे जाहीर केले. महिना उलटून गेला तरी खासगी दुकानांतील गर्दी कमी झालेली नाही. अजूनही अनेक औषधे रुग्णालयामध्ये उपलब्धच नसल्याने खासगीशिवाय पर्याय नाही. अधिष्ठातांच्या आदेशानुसार डॉक्टरांकडून चिठ्ठी दिली जात नसली तरी रुग्णांसाठी नातेवाईकांना पैसे मोजावेच लागत असल्याचे चित्र आहे.
डॉ. ठाकूर यांनी महिनाभरापूर्वीच पदभार स्वीकारला आहे. रुग्णांना डॉक्टर आवश्यकतेनुसार औषधे देत असतात. रुग्णालयात उपलब्ध असलेली औषधे तिथेच दिली जातात, पण नसलेल्या औषधांसाठी डॉक्टरांकडून चिठ्ठी लिहून दिली जात होती. त्यानुसार नातेवाईक खासगी औषधे खरेदी करत. त्यामुळे मोफत उपचारांना काहीच अर्थ नव्हता. महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेसह विविध शासकीय योजनांमध्ये रुग्णांना ठराविक रकमेपर्यंत उपचार मोफत दिले जातात. रुग्णालयात अनेक औषधे उपलब्धच नसल्याने नातेवाईकांना औषधे बाहेरूनच आणावी लागतात.
अधिष्ठातांनी महिनाभरापूर्वी सर्व विभागप्रमुख, डॉक्टरांना चिठ्ठी पध्दत बंद करण्याची सूचना दिली. एकही औषध बाहेरून आणले जाऊ नये. सर्व औषधे रुग्णालयातूनच दिली जावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यांची ही घोषणा हवेतच विरली आहे. आजही अनेक नातेवाईकांची खासगी औषध दुकानाबाहेर गर्दी दिसून येते. वर्षानुवर्षे अनेक औषधे रुग्णालयात उपलब्ध होत नाहीत किंवा मर्यादित स्वरूपात मिळतात. काही वेळा रुग्णाच्या आवश्यकतेनुसार ही औषधे मागवावी लागतात. पण एखाद्या रुग्णाला तातडीने औषध हवे असल्यास नातेवाईकांना पदरमोड करावी लागते.
रुग्णालयातील एका डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिष्ठातांच्या सूचनेनुसार रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जात नाही. पण प्रत्यक्षात सर्वच औषधे रुग्णालयात अजूनही मिळत नाहीत. अनेक लाईफसेव्हिंग औषधे, दुर्मिळ आजारांची, महागडी औषधे मिळत नाहीत. शस्त्रक्रियांसाठी लागणारे काही साहित्य, औषधेही मिळत नाहीत. त्यासाठी खासगी दुकानांशिवाय पर्याय नाही. रुग्णांच्या नातेवाईकांना त्याची कल्पना देऊन खर्चाची तयारी आहे किंवा नाही, हे पाहिले जाते. ते खर्च करण्यास तयार असतील तर तेच औषधे आणतात. अन्यथा सीएसआरच्या माध्यमातून औषधे मिळविण्याचा प्रयत्न असतो. प्रत्येक वेळी सीएसआरमधून मदत मिळेलच असे नाही. त्यामुळे अनेकदा रुग्णांना खासगी दुकानांमध्ये जाण्याशिवाय पर्याय नसतो.
खासगी दुकानात आलेल्या एका नातेवाईकाने सांगितले की, ‘मुलाला अपघातानंतर ससूनमध्ये दाखल केले आहे. मागील दहा दिवसांपासून उपचार सुरू आहेत. काही औषधे तसेच शस्त्रक्रियेसाठीचे साहित्य खासगी दुकानातूनच घ्यावे लागले. आवश्यकतेनुसार डॉक्टरांकडून औषधे सांगितली जातात, पण रुग्णालयात नसल्याने बाहेरून घ्यावी लागत आहेत.’ रुग्णालयाच्या औषध विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, ‘सर्व विभागांकडून औषधांची यादी मागविण्यात आली आहे. अनेक औषधे वर्षानुवर्षे मिळतच नाही. तीच स्थिती अजूनही आहे. त्यासाठी खरेदीची प्रक्रिया व्हावी लागते. काही औषधे महागडी आहेत. काही वेळा ससून रुग्णालयाच्या सीएसआर फंडमधूनही खर्च केला जात आहे. त्यालाही मर्यादा आहेत.’
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.