गोष्ट हेल्मेटधारी एली आणि वाहतूक पोलिसाची

पुणे शहरातील वाहतूक पोलीस हवालदार आतिश चंद्रकांत खराडे वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी एक कल्पक योजना राबवत आहेत. दुचाकीवरून फिरताना सर्वांनी आपल्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर केला पाहिजे. हेल्मेट वापरा हा संदेश देण्यासाठी खराडे आपला लाडका कुत्रा एली याला हेल्मेट घालून गाडीवर फिरवत आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Sat, 1 Apr 2023
  • 07:39 am
गोष्ट हेल्मेटधारी एली  आणि वाहतूक पोलिसाची

गोष्ट हेल्मेटधारी एली आणि वाहतूक पोलिसाची

हेल्मेट वापराच्या जागृतीसाठी वाहतूक पोलीस कुत्र्याला हेल्मेट घालून फिरवतोय

अनुश्री भोवरे

feedback@civicmirror.in

पुणे शहरातील वाहतूक पोलीस हवालदार आतिश चंद्रकांत खराडे वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी एक कल्पक योजना राबवत आहेत. दुचाकीवरून फिरताना सर्वांनी आपल्या सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर केला पाहिजे. हेल्मेट वापरा हा संदेश देण्यासाठी खराडे आपला लाडका कुत्रा एली याला  हेल्मेट घालून गाडीवर फिरवत आहेत.

पुणे शहरात दररोज लाखो नागरिक दुचाकीवरून प्रवास करत असतात. शहरात दुचाकीवरून फिरणारे नागरिक स्वतःच्याच सुरक्षिततेविषयी बेफिकिर असलेले पाहावयास मिळते. वाहतूक पोलीस आणि सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात असले तरी प्रवासी हेल्मेट घालण्यास तयार नाहीत. खराडे यासाठी प्रयत्न करत आहेत. आतिश खराडे हे एक वर्षापासून वाहतूक विभागात काम करत आहेत. त्यांच्या कामाची वेळ संपल्यानंतर ते दुचाकी चालवताना हेल्मेट वापराच्या आवश्यकतेबद्दल समाजात जनजागृती व्हावी, सगळ्या नागरिकांना त्याचे महत्त्व कळावे यासाठी ते प्रयत्न करत आहेत. ते सांगतात, माझ्या कुत्र्याला हेल्मेट घालून शहरात चक्कर मारत असताना याकडे लोक कुतूहलाने पाहतात. त्यातून प्राणी फिरताना हेल्मेट वापरतो मात्र बुद्धिजीवी, आपल्या स्वतःच्या भल्याबुऱ्याचा विचार करू शकणारा मानव स्वतःच्याच सुरक्षिततेविषयी बेपर्वा का, असा संदेश जातो. त्यावेळी भेटणाऱ्या अनेकांनी नियमित हेल्मेट वापरणार असे आश्वासन मला दिले आहे. नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, असे खराडे यांनी सांगितले.

जनजागृतीच्या या विलक्षण पद्धतीमुळे इकडे  लोकांचे लक्ष वेधले जाते. ते खराडे यांना या विषयी विचारतात. नंतर आपणही हेल्मेट वापरणार असल्याचे सांगतात. तसेच एलीसोबत फोटो, सेल्फी काढतात. एलीच्या या संदेशामुळे ती आता खूपच प्रसिद्ध झाली आहे. तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेक लोक थांबलेले असतात. एलीचा व्हीडीओ समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे.

नागरिकांकडूनही या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. सिंहगड रस्त्यावरील रहिवासी विक्रम पवार या उपक्रमामुळे आनंदित झाले. ते याचे तोंड भरून कौतुक करतात, तर कोथरूडचा रहिवासी मयूर गायकवाड (२३) म्हणतात  “मी हेल्मेट न घालता दुचाकी चालवत असे, पण जेव्हा मी खराडे यांना त्यांच्या कुत्र्यासोबत पाहिले तेव्हा मला लाज वाटली. तसेच रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवल्याबद्दल खराडे सरांनी मला खडसावले आणि दुचाकी चालवतानाची आपली जबाबदारी काय असते ती सांगितली. तेव्हा मी नियमित हेल्मेट वापरण्याचा निश्चय केला. आणि त्याची अंमलबजावणीही करत आहे.”

किरण रिपोटे नावाचा तरुण सांगतो “मी हेल्मेट न घालता दुचाकी चालवत होतो. तेव्हा मी या पोलिसाला त्याच्या लहान कुत्र्यासोबत पाहिले. जेव्हा मी कुत्र्याला हेल्मेट घातलेले पाहिले तेव्हा मला आतून काहीतरी वाटले. वर्षभरापूर्वी माझा अपघात झाला, पण त्यानंतरही हेल्मेट घालावेसे वाटले नाही. आता माझ्या अंदरकी आवाज मला हेल्मेट वापरायला सांगत आहे.

खराडे सांगतात मी २००७ पासून पोलीस दलात काम करत आहे. रस्त्यावरील अनेक अपघात मी पाहिले आहेत.  बेफिकिरीमुळे अनेकांना त्याचा चांगलाच फटका बसला आहे. ज्यामुळे त्यांचे कुटुंब काही मिनिटांत उद्ध्वस्त झाले आहेत. यात झालेले नुकसान परत भरून काढणे शक्य नसते. हेल्मेट वापरले नाही म्हणून जिवास मुकावे लागले. या चुकीमुळे सर्व काही संपले. एकदा मी माझी ड्यूटी संपवून घरी परतत असताना एक मुलगा हेल्मेट न घालता बाईक चालवताना दिसला. अचानक तो घसरला आणि पडला. त्याच्या डोक्याला दुखापत होऊन रक्त वाहू लागले. त्याच्याभोवती गर्दी जमली पण कुणीही त्याला दवाखान्यात नेण्यास तयार नव्हते. मी त्याला ताबडतोब रुग्णालयात पाठवले. त्याने हेल्मेट घातले असते तर यातून तो बचावला असता.  

नागरिकांनी इतरांसाठी नाही किमान स्वत:साठी हेल्मेट वापरले पाहिजे. हेल्मेट ही फॅशन अॅक्सेसरी नाही. हे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. खराडे हे येरवडा परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर आणि कॅंटोन्मेंट या भागातील शाळांना भेटी देऊन त्यांना रस्ता सुरक्षाविषयी माहिती देऊन जागरूकता निर्माण करतात. त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की, अनेक किशोरवयीन मुले दुचाकीवर शाळेत येतात. त्यांच्याजवळ वाहन चालवण्याचा परवाना नसतो. अनधिकृतपणे ते गाडी चालवत असतात. शाळा प्रशासनाच्या इशाऱ्यांनंतरही मुले रस्ता सुरक्षेबाबत गंभीर नाहीत. आम्ही इयत्ता ७ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा उपाय, वाहन परवाना बनवणे, चुकीच्या मार्गाने वाहन चालवण्याचे धोके, अपघात इत्यादींबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. या उपक्रमालाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे आता अनेक विद्यार्थी सायकलवरून शाळेत येत आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकारी म्हणाले, "कर्तव्याच्या पलीकडे जाऊन समाजासाठी वेगळे काही करणाऱ्या पोलीस कर्मचा-यांना  आम्ही नेहमीच प्रोत्साहन देत असतो. खराडे त्यापैकी एक."

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story