तलवार फिरवणे पडले महागात
सीविक मिरर ब्यूरो
कोथरूडमधील शास्त्रीनगर येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात गोंधळ घातल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगारावर कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड येथे अण्णाभाऊ साठे जयंती साजरी होत असताना ओंकार शंकर कुदळे हा सराईत गुन्हेगार तेथे आला. उपस्थित असलेल्या महिला व लहान मुलांना त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. उत्सव साजरा करणाऱ्या लोकांवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना याबाबतची मिळताच गुन्हे शाखा आणि कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
कुडले आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३०७ आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ओंकारवर यापूर्वी कोथरूड पोलिसांनी शिवीगाळ करणे आणि पोलीस हवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना सांगितले की, “आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याने त्याच्या साथीदारासह जयंती उत्सवाच्या कमानीची तोडफोड केली. लोकांना शिवीगाळ केली. आरोपी व त्याच्या साथीदारांनी अण्णाभाऊ साठे यांच्या फोटोची तोडफोड करून तलवार हवेत फिरवत दहशत निर्माण केली व लोकांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.