गोष्ट विसरलेल्या दुभाजकाची...

नागरिकांनी प्रदीर्घ काळ संघर्ष केल्यानंतर नांदेड फाटा ते किरकटवाडी हा २७ कि.मी. चा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी बांधला. भविष्याचा विचार करून रस्ता १२० फूट रुंद आणि सिमेंटमध्ये तयार केला. रस्त्यावर साधारण दीड कि.मी. च्या भागात दुभाजकासाठी खड्डा खोदला. दोन वर्षांच्या काळात दुभाजक बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग विसरून गेला. आता दुभाजक विसरलेला हा रस्ता प्राणघातक अपघात आणि मृत्यूला निमंत्रण देत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Mon, 13 Mar 2023
  • 12:47 pm
गोष्ट विसरलेल्या दुभाजकाची...

गोष्ट विसरलेल्या दुभाजकाची...

सार्वजनिक बांधकाम िवभागाचा प्रताप; नांदेड फाटा-किरकटवाडीच्या दीड िकमी रस्त्यावर दुभाजक नसल्याने सलग खोल खड्ड्यांची मािलका देत आहे अपघातांना निमंत्रण

नििखल घोरपडे/ नितीन गांगर्डे 

nikhil.ghorpade/nitin.gangarde@civicmirror.in

 feedback@civicmirror.in

नागरिकांनी प्रदीर्घ काळ संघर्ष केल्यानंतर नांदेड फाटा ते किरकटवाडी हा  २७ कि.मी. चा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी बांधला. भविष्याचा विचार करून रस्ता १२० फूट रुंद आणि सिमेंटमध्ये तयार केला. रस्त्यावर साधारण दीड कि.मी. च्या भागात दुभाजकासाठी खड्डा खोदला. दोन वर्षांच्या काळात दुभाजक बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग विसरून गेला. आता दुभाजक विसरलेला हा रस्ता प्राणघातक अपघात आणि मृत्यूला निमंत्रण देत आहे. 

हा रस्ता तयार करावा ही स्थानिक नागरिकांची दीर्घ काळ मागणी होती. रस्ता प्रशस्त असल्याने बांधकामावेळी दुभाजक बनवण्यासाठी दोन फूट रुंद आणि तेवढीच खोली असलेला खड्डा खोदण्यात आला. मात्र, दुभाजकाच्या कामाने गती काही घेतली नाही. दरम्यान त्यासाठी निधी उपलब्ध झाला नसल्याने दुभाजकाच्या खोदलेल्या जागेत मातीचा भराव टाकला. ही मातीही पावसाच्या पाण्याने वाहून गेली. शिल्लक माती दुभाजकाच्या खाली दबली गेली. परिणामी आता तेथे सहा-सात इंचाचा खड्डा पडलेला आहे. परिणाम व्हायचा तोच झाला. गेली दोन वर्षे येथे अपघातांची मालिका सुरू आहे. असंख्य वाहनांचे नुकसान झाले आहे, अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे तर अनेकजण गंभीर जखमी होऊन अधूही झालेले आहेत. 

या रस्त्यावरून ज्यांना नेहमी ये-जा करावी लागते त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या. मात्र, दुभाजकासाठी बांधकाम विभाग निधी उपलब्ध करू शकला नाही. त्यामुळे हा रस्ता मृत्यूला, अपघातांना निमंत्रण देणारा बनला आहे.  

या रस्त्यावर सकाळी, सायंकाळी वाहनांची मोठी वर्दळ असते. निर्धारित ठिकाणी लवकर पोहोचण्यासाठी दुचाकीचालक ओव्हरटेक  करत असतात. अशावेळी खड्ड्याचा अंदाज न आल्याने येथे दररोज दुचाकीचे छोटे-मोठे अपघात होत आहेत. रात्रीही या मार्गावर नेहमी  वाहतूक असते. ट्रेकिंगसाठी जाणारे येथून रात्रीच्या वेळी दुचाकीने प्रवास करत असतात. आसपासचे ग्रामस्थही नोकरी किंवा अन्य काही कारणांसाठी ये-जा करत असतात. रस्त्याच्या बाजूला विजेचे दिवे नाहीत. त्यामुळे अंधाऱ्या वातावरणात दुभाजकाच्या जागी असलेला खड्डा दिसत नाही. त्यामुळे अनेक वेळा दुचाकीस्वार खड्ड्यात जातात. अशाच कारणाने येथे अनेक प्राणघातक अपघात झाले आहेत. रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून प्रवास करणे मोठे धोक्याचे ठरत आहे. 

पान १ वरून  अशाच एक घटनेत करण वाघमारे नावाचा तरुण मरता मरता वाचला आहे. याबाबत तो म्हणतो की, " प्रवासावेळी खड्ड्याचा अंदाज न आल्याने माझी दुचाकी या खड्ड्यातून  घसरून थेट समोरून येणाऱ्या पीएमपीखाली गेली. प्रसंगावधान राखत तातडीने मी दुचाकीवरून उडी मारल्याने माझे प्राण वाचले. मात्र, अपघातात मी जखमी झालो.  अपघात टाळण्यासाठी येथे तातडीने दुभाजक बनवण्याची गरज आहे.  किती अपघातांनंतर किंवा किती प्राण गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार. 

याबाबत येथील स्थानिक रहिवासी समीर रुपदे म्हणाले की, " एकदा रात्री मी पत्नीसोबत दुचाकीवरून एका कार्यक्रमाला गेलो होतो.  दुभाजक नसलेल्या रस्त्यावर पूर्ण अंधार आहे. कार्यक्रमानंतर घरी येताना माझी गाडी खड्ड्यात गेली. गाडी फार वेगात नसल्याने  मी वाचलो. दुभाजकासाठी ठेवलेला हा खड्डा अत्यंत धोकादायक असून  यात मोठी दुर्घटना होऊ शकते"

नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागू नये यासाठी आणि प्रवास  सुरक्षित व्हावा यासाठी रस्त्यावर दुभाजक बांधले जातात. त्यात झाडे लावून सौंदर्य वाढवले जाते. मात्र, येथे चित्र उलटे दिसते. अपघातांना निमंत्रण मिळावे यासाठी दुभाजकाचे काम अर्धवट ठेवून रस्त्यावर खड्डे ठेवले आहेत. दुभाजक बांधायचा नसेल तर गेली दोन वर्ष दीड किलोमीटर अंतरावर असलेले खड्डे बुजवून तरी टाकायला हवेत. किती अपघात किंवा किती मृत्यू झाल्यानंतर हे काम हाती घेण्याचा बांधकाम विभागाचा विचार आहे. प्रशासन याकडे कधी गांभीर्याने लक्ष देणार आहे, असा प्रश्न समीर रुपदे यांनी विचारला आहे.  प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने येथील काम पूर्ण करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

या रस्त्याच्या कामाची निविदा प्रथम जेव्हा काढली गेली तेव्हा दुभाजकाची तरतूद नव्हती. मात्र, हा रस्ता प्रशस्त असल्याने दुभाजकाची गरज असल्याचे लक्षात आल्यावर त्यासाठी वेगळी निविदा काढण्यात आली. त्यानंतर दुभाजकासाठी खड्डे खोदण्यात आले. मात्र, त्याचे काम पूर्ण करण्याचे कोण आणि का, कसे विसरले हे मात्र काही समजण्यास मार्ग नाही.  

येथील दुभाजकासाठी वेगळी निविदा काढल्याने निधीची तरतूद आहे.  आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला येथील रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी निवेदन दिले आहे. त्याचा नियमित आम्ही पाठपुरावा करत आहोत. परंतु त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. येथील काम लवकर पूर्ण करावे. रस्त्यावर प्रकाश असावा यासाठी योग्य अंतरावर पथदिवे बसवावेत, अशी मागणी  सौरभ नाना मते या सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे. 

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ज्ञानेश्वर राठोड यांच्याशी रविवारी रात्री उशिरापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. यामुळे दुभाजकाचे काम अजूनही अर्धवट का आहे, याबाबतची त्यांची बाजू समजू शकली नाही.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story