दगडी बैठक व्यवस्था झाली स्वच्छ
नितीन गांगर्डे
पानमळा वसाहतीच्या पुढे सिंहगड रस्त्यावर पदपथाच्या बाजूला असलेले ओटे कचऱ्याने ओसंडून वाहात असल्याचे वृत्त सीविक मिररने प्रसिद्ध केल्यावर महापालिकेला जाग आली असून त्यांनी ओट्यातील कचऱ्यांची स्वच्छता केली आहे. २२ फेब्रुवारीच्या अंकात "बसायचे का आता कचऱ्याच्या ढिगात" असे वृत्त प्रसिद्ध करत सीविक मिररने तेथील स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केला होता.
पुण्यातील पानमळा वसाहतीच्या पुढे काही अंतरावर सिंहगड रस्त्याच्या बाजूला महानगरपालिकेने पदपथ बांधले आहेत. प्रशस्त पदपथावर काही काळ नागरिकांना विश्रांती घेता यावी यासाठी ओटे बांधले आहेत. या दगडी ओट्यांच्या बाजूला, आसपास विक्रेते, भाजीविक्रेते बसलेले असतात. अनेकांनी मोक्याच्या ओट्यावर अतिक्रमण केले आहे. भाजी विक्री केल्यानंतर राहिलेला कचरा याच ओट्यामध्ये टाकला जात होता. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांचाही हे ओटे कचरा टाकण्यासाठीच बांधले आहेत असा समज व्हायचा. या समजातून नागरिकही खुलेआम त्या ओट्यात कचरा टाकत होते. त्यामुळे बसण्यासाठी बांधलेल्या ओट्यांचे रूपांतर कचरा कुंड्यात झाले होते.
महापालिकेकडून शहरात पादचाऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी "अर्बन स्ट्रीट गाइडलाइन्स' अंतर्गत पदपथ विकसित केले जातात. यात पदपथावर नागरिकांना सायकल चालवण्याासाठी मार्ग, बसण्यासाठी जागा बनवली जाते. पुण्यात अनेक ठिकाणी अशी कामे करण्यात आली आहेत. जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, पुणे महापालिका भवनसमोरील रस्त्यावर असे सुशोभीकरण केले आहे. सिंहगड रस्त्यावर पर्वती जलकेंद्रापासून पु. ल. देशपांडे उद्यानापर्यंत असे सुशोभीकरण केले आहे. त्यानंतर आता हे काम देशपांडे उद्यान आणि पुढे महावितरणच्या कार्यालयापर्यंत वाढवले आहे. विक्रेते, नागरिकांच्या गैरसमजामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सुंदर पदपथावर नागरिकांसाठी बांधलेले ओटे कचराकुंड्यात रूपांतरित झाले होते.
महानगरपालिकेने येथील पदपथाचे काम पूर्ण केलेले नाही. अशा अर्धवट पदपथावर विक्रेते विक्रीसाठी पथारी टाकतात. विक्री झाल्यावर शिल्लक भाज्या, कचरा ओट्यांमध्ये टाकला जातो. त्यामुळे ओटे कचऱ्याने ओसंडून वाहात होते. येथे महानगरपालिकेने एकही सफाई कर्मचारी ठेवलेला नाही. पालिकेने सिंहगड रस्त्यावरील स्वच्छतेचे काम एका खासगी कंपनीला दिले आहे. या कंपनीचे चार-पाच कर्मचारी सारस बागेपासून नांदेड सिटीपर्यंतची सफाई करतात. सफाईचे काम फक्त रात्रीच केले जाते. एवढ्या मोठ्या भागाची सफाई आणि तीही रात्री करत असल्यामुळे अंधारात व्यवस्थित स्वच्छ्ता होत नाही. स्वच्छता नसल्यामुळे ओट्यावर नागरिकही बसत नव्हते. सीविक मिररने केलेल्या बातमीची दखल घेऊन प्रशासनाने येथील कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे. त्यामुळे नागरिक सुखावले आहेत. आता ते बसण्यासाठी ओट्याचा वापर करू शकतात.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.